Desk | Wardha
शेतातील पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर अचानक वाघाने हल्ला केला. प्रसंगावधान राखत शेतकऱ्याने हातातील प्लास्टिकचा टब वाघाच्या दिशेने फेकून जोरदार प्रतिकार केला. या घटनेत शेतकरी जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. वर्धा तालुक्यातील पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने अचानक झडप घातली. दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शेतकरी शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. वाघ अचानक अंगावर आल्याने शेतकरी घाबरला. मात्र, त्याने प्रसंगावधान राखत जवळ असलेला प्लास्टिकचा टब वाघाच्या दिशेने फेकला. त्यानंतर आरडाओरड करत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याच्या प्रतिकारामुळे वाघाने तेथून पळ काढला. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून त्याला पोलिस
प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करताना वाघाचा वावर असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वन विभागाने या परिसरात पाहणी करून वाघाचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
