Top 5 This Week

Related Posts

BREAKING

AMRAVATI : तडणीजवळ वाघिणीची प्रकृती खालावली; उपचारात मृत्यू !

Desk | amravati 

नरभक्षी वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू; मोर्शी-चांदूर बाजार परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ  अमरावती : गेल्या पंधरा दिवसांपासून मोर्शी आणि चांदूर बाजार परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षी वाघिणीचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर या वाघिणीला ब्राह्मणवाडा थळी परिसरातून गुंगीचे औषध देऊन ताब्यात घेतले होते. मात्र, उपचारासाठी अमरावतीच्या दिशेने नेत असताना तिची प्रकृती अचानक खालावली आणि उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यातील विविध भागांमध्ये या वाघिणीने दहशत निर्माण केली होती. वाघिणीच्या हल्ल्यांमुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतात जाणाऱ्या नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण होते. वाघिणीचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून विशेष पथक तैनात करण्यात आले होते. अखेर ब्राह्मणवाडा थळी परिसरात वनविभागाच्या पथकाला वाघिणीला पकडण्यात यश आले. वाघिणीला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले आणि त्यानंतर तिला पुढील उपचारांसाठी अमरावतीच्या दिशेने नेण्यात येत होते. दरम्यान, मोर्शी मार्गावरील तडणी येथील इंग्लिश स्कूलजवळ वाघिणीची प्रकृती अचानक खालावली. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर वनविभागासह परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.  या वाघिणीने मागील काही दिवसांत अनेक नागरिकांवर हल्ले केल्याचे सांगण्यात येत आहे. आष्टी येथील भांबोरा परिसरात ईश्वरदास एके या शेतकऱ्यावर वाघिणीने हल्ला केला होता. त्याचप्रमाणे सोनोरी येथे उर्मिला येवणे या 15 वर्षीय युवतीवरही वाघिणीने हल्ला केल्याची माहिती आहे. शिरजगाव कसबा येथे दिनेश आवारे यांच्यावरही हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यांच्या मालिकेमुळे मोर्शी आणि चांदूर बाजार परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आतापर्यंत या वाघिणीच्या हल्ल्यांमध्ये चार जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागावर मोठा दबाव होता. वाघिणीला पकडल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याने आता तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे उपचार आणि शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे वनविभागाच्या कारवाईकडे आणि वाघिणीच्या मृत्यूच्या कारणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती आहे.