Desk : nagpur
नंदनवनमध्ये चोरीच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; मिरची पावडर टाकून चाकूने वार, तिघांना अटक नागपूरच्या नंदनवन परिसरात चोरीच्या प्रकरणातून सुरू असलेल्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमरस बारच्या बाहेर एका तरुणाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्यावर चाकू आणि लोखंडी हत्याराने हल्ला करण्यात आला. या घटनेत तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्ला थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या दुसऱ्या तरुणावरही चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. ही घटना 25 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सोमरस बारच्या बाहेर घडली. पोलिसांनी या प्रकरणी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादाची सुरुवात चोरीच्या एका प्रकरणातून झाली. 21 ऑगस्ट रोजी आरोपी सुरज लांजेवार याचा भाऊ आकाश लांजेवार याला चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर सुरज लांजेवार याने अश्विन उर्फ सोनू राहांगडाले याच्यावर पोलिसांना चोरीची माहिती दिल्याचा आरोप केला. याच कारणावरून सुरजने अश्विनला धमकी दिल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर 25 ऑगस्ट रोजी अश्विन आणि त्याचा मित्र अक्षय वंजारी हे सोमरस बारमध्ये बसले होते. काही वेळाने अक्षय बारच्या खाली आल्यानंतर आरोपी वंदना लांजेवार हिने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकल्याचा आरोप आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर अक्षयला आरोपींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रदीप आखरे, प्रशांत आखरे, सुरज लांजेवार आणि इतर आरोपींनी अक्षयवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. प्रदीपने लोखंडी हत्याराने, तर प्रशांत आखरे आणि सुरज लांजेवार यांनी चाकूने अक्षयवर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अक्षय जखमी झाला. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी अश्विन पुढे आला. मात्र आरोपींनी त्याच्यावरही चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर जखमी अक्षयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी पाच नामजद आणि तीन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच आर्म्स अॅक्टच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सुरज लांजेवार, वंदना लांजेवार आणि प्रदीप आखरे या तिघांना अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. चोरीच्या प्रकरणातून सुरू झालेला वाद थेट चाकू आणि लोखंडी हत्यारांच्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने नंदनवन परिसरात या घटनेची चर्चा आहे. या हल्ल्यामागील नेमका घटनाक्रम, इतर आरोपींचा सहभाग आणि वादाचे कारण याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.
