Top 5 This Week

Related Posts

BREAKING

AMRAVATI | अमरावतीत चायना चाकू घेऊन दहशत; तरुण पोलिसांच्या ताब.

Desk :Amravati 

अमरावतीत हातात चायना चाकू घेऊन दहशत; फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात  अमरावती शहरात हातात चायना चाकूसारखे प्राणघातक शस्त्र घेऊन त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी एका १८ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चायना चाकू जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन नेवारे असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो अमरावती शहरातील मालू नगर, गोपाल नगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चौहान यांना या तरुणाबाबत गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे राजापेठ पोलिसांच्या डीबी पथकाने शिवशक्ती नगर आणि गोपाल नगर परिसरात सापळा रचला. त्यानंतर संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अंदाजे ८०० रुपये किमतीचा एक चायना चाकू आढळून आला. पोलिसांनी हा चाकू जप्त केला आहे. हातात शस्त्र घेऊन त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषतः इन्स्टाग्रामवर अपलोड करून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

तरुणाकडे हे शस्त्र नेमके कशासाठी होते आणि त्यामागे आणखी काही उद्देश होता का, याबाबत पोलीस तपास करत आहेत. अमरावती शहरात सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन करून दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. अशा प्रकारे शस्त्रांचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या पोस्टपासून दूर राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्त राकेश ओला तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन करून दहशत निर्माण करणाऱ्यांना पोलिसांचा स्पष्ट इशारा मिळाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापेठ पोलीस करत असून, तपासातून आणखी काही माहिती समोर येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.