Top 5 This Week

Related Posts

BREAKING

MAHARASHTRA : मंदिर रामभक्तांनी बांधले, भाजपाने दानपेटी लुटली आरोप

Desk | Mumbai

काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली. “राम मंदिर हे देशातील कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धा, विश्वास आणि त्यागातून उभे राहिले आहे. मात्र भाजपाने मंदिराचा राजकीय वापर करत आता दानपेटीवरही डल्ला मारला आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या १२ वर्षांच्या सत्ताकाळात मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान केले आहे. “युवकांचे रोजगार हिरावून घेतले, शेतकऱ्यांचे आयुष्य संकटात ढकलले आणि उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी देशाची संपत्ती वापरली. आता तर प्रभू श्रीरामांच्या नावाने उभारलेल्या मंदिरातील भक्तांच्या दानालाही हात घालण्यात आला आहे,” असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, अयोध्येतील श्रीराम मंदिराचा वापर  वडणुकांमध्ये राजकीय फायदा मिळवण्यासाठी करण्यात आला. सत्ता मिळाल्यानंतर मंदिराच्या व्यवस्थापनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, देश-विदेशातील लाखो भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत, असे त्यांनी सांगितले. वडेट्टीवार यांनी आरोप केला की,

मंदिरातील दानपेटीतील रक्कम, प्रभू श्रीरामांच्या गळ्यातील हार, पादुका आणि इतर मौल्यवान वस्तूंबाबत समोर आलेल्या कथित गैरव्यवहारामुळे रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. “ही केवळ आर्थिक लूट नाही, तर कोट्यवधी श्रद्धाळूंच्या विश्वासाचा अपमान आहे. प्रभू श्रीरामांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनीच त्यांच्या मंदिराची प्रतिष्ठा धुळीस मिळवली,” अशी टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. “खऱ्या आरोपींवर कारवाई करण्याऐवजी काही लहान कर्मचाऱ्यांवर जबाबदारी टाकून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली. वडेट्टीवार यांनी भाजपावर धार्मिक भावना आणि श्रद्धेचा राजकीय फायद्यासाठी वापर केल्याचाही आरोप केला. “राम मंदिर हे कोणत्याही एका पक्षाचे नाही, ते संपूर्ण देशातील रामभक्तांचे आहे. त्यामुळे मंदिराशी संबंधित प्रत्येक व्यवहार पारदर्शक असला पाहिजे. भक्तांनी श्रद्धेने दिलेल्या प्रत्येक रुपयाचा योग्य हिशोब देशासमोर ठेवला पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने या प्रकरणावर मौन बाळगल्यास जनतेच्या मनातील संशय आणखी वाढेल, असेही त्यांनी नमूद केले. “रामाच्या नावावर मतं मागणाऱ्यांनी आता रामभक्तांना उत्तर द्यावे. मंदिर उभारणाऱ्या भक्तांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सत्य बाहेर आलेच पाहिजे आणि दोषींना कोणतीही राजकीय संरक्षण न देता कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.