Top 5 This Week

Related Posts

BREAKING

MAHARASHTR : NEET-TET पेपरफुटी; सरकारवर वडेट्टीवारांचा हल्लाबोल.

Desk | Mumbai

महाराष्ट्रात NEET, TET यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे राज्याची देशभर बदनामी होत असून लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी तीव्र टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारांवर सरकारने कठोर भूमिका घ्यावी आणि संपूर्ण पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणी त्यांनी केली. विधानसभेत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील लाखो विद्यार्थी आणि शिक्षक वर्षानुवर्षे मेहनत घेऊन विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. अनेक कुटुंबे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा आर्थिक खर्च करतात. मात्र, वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरत आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निराशा आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे.

सरकारकडून परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने घेण्यात सातत्याने अपयश येत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला की, “राज्यातील परीक्षा व्यवस्था इतकी असुरक्षित का झाली आहे? प्रत्येक वेळी पेपरफुटी कशी होते आणि यासाठी जबाबदार कोण?” याचे स्पष्ट उत्तर सरकारने महाराष्ट्रातील जनतेला द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. TET पेपरफुटी प्रकरणाचा उल्लेख करत वडेट्टीवार यांनी सांगितले की, या प्रकरणात तीन आरोपींना अटक झाली असली तरी तपासात त्यांचे इतर राज्यांशीही संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ही केवळ काही व्यक्तींची कृती नसून एक संघटित रॅकेट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पेपर तयार करणाऱ्या संस्था, संबंधित कंपन्या आणि या संपूर्ण साखळीची सखोल चौकशी करून या घोटाळ्यामागील प्रत्येक सूत्रधाराला कायद्याच्या चौकटीत आणावे, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. यावेळी त्यांनी २०१८ मधील TET घोटाळ्याचाही उल्लेख केला. त्या प्रकरणातील आरोपी अभिषेक सावरीकर याला नंतर भाजपमध्ये सन्मानाने प्रवेश मिळाल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. तसेच, या प्रकरणात क्रिस्टल कंपनीचे नाव समोर येत असल्याने सरकारच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे हे घोटाळे सरकारपुरस्कृत आहेत का, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करणे अत्यावश्यक असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. दोषींना कठोर शिक्षा, पारदर्शक तपास आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. अन्यथा विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायमचा उडेल आणि राज्याची प्रतिमा देशभर आणखी मलिन होईल, असा इशाराही त्यांनी