Desk | Nagpur
महाराष्ट्रातील टीईटी परीक्षेच्या कथित पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात वारंवार होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. विजय वडेट्टीवार म्हणाले की, “महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? टीईटी पेपर ठाण्यात फुटतो आणि नीट पेपरफुटीचे धागेदोरेही आपल्या राज्यात सापडतात. परीक्षा कोणतीही असो, पेपर फुटणारच ही या सरकारची ओळख बनली आहे. दिवस-रात्र मेहनत करून अभ्यास करणाऱ्या कष्टकरी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा हा उघडउघड खून आहे.” सरकारवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, राज्य सरकारला साधी परीक्षा सुरक्षितपणे घेता येत नसल्याचे या घटनांमधून स्पष्ट होत आहे. सत्ताधाऱ्यांचे संपूर्ण लक्ष केवळ सत्ता आणि खुर्च्या टिकवण्यावर असून विद्यार्थी आणि पालकांच्या भावना व भविष्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. वडेट्टीवार यांनी पुढे सांगितले की, लाखो युवक अनेक वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात.
कुटुंब आर्थिक अडचणींवर मात करत मुलांना शिक्षणासाठी मदत करते. मात्र पेपरफुटीच्या घटनांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून गैरप्रकार करणाऱ्यांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात कोणत्याही परीक्षेत पेपरफुटी होणार नाही यासाठी कायमस्वरूपी आणि प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणीही त्यांनी केली. “जर सरकारला थोडी जरी लाज उरली असेल, तर त्यांनी या प्रकारावर कायमचा बंदोबस्त करावा. परीक्षार्थ्यांच्या कष्टाचा बाजार मांडणाऱ्या राज्यकर्त्यांना सत्तेवर बसण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” असेही विजय वडेट्टीवार यांनी ठामपणे म्हटले. दरम्यान, राज्यातील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून रीक्षाप्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विरोधकांनी सरकारकडून तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
