Top 5 This Week

Related Posts

BREAKING

NAGPUR : विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात

Desk | Nagpur

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत ओबीसी जनगणना, दुष्काळ, NEET परीक्षा आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर तीव्र टीका केली. ओबीसी समाजाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडली. वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना होणे ही काळाची गरज आहे. संसदेत पंतप्रधानांनी जनगणनेबाबत घोषणा केली असली, तरी सध्याच्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र स्तंभ नसल्यामुळे समाजाच्या हक्कांवर गदा येऊ शकते. त्यामुळे सरकारने तातडीने स्वतंत्र ओबीसी जनगणनेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीसाठी राज्यभर आंदोलन उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना वडेट्टीवार यांनी भाजपवर लोकशाही कमकुवत करण्याचा आरोप केला. “वन नेशन, वन इलेक्शन”च्या माध्यमातून देशात एकपक्षीय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्ष संपवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा दावा करत त्यांनी लोकशाही टिकवण्यासाठी जनतेने सतर्क राहण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकारण सतत बदलत असते.

कोणताही पक्ष किंवा विचारधारा संपवता येत नाही. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून महाराष्ट्राच्या हितासाठी काम सुरू ठेवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. NEET परीक्षेच्या व्यवस्थापनावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागपूरमधील एका विद्यार्थ्याला अबुधाबी येथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा साधला. देशात परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबतही वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. जून महिना संपत आला असून अनेक धरणांमधील पाणीसाठा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. पुढील 15 दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्री आणि संबंधित विभागांनी तातडीने बैठक घेऊन जनतेसमोर ठोस कृती आराखडा मांडावा, अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय, बीएस इस्पात परिसरातून मोठ्या प्रमाणात कोळसा तस्करी होत असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची सीबीआय किंवा एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. या गैरव्यवहारात सर्व पक्षांतील काही लोकप्रतिनिधींचा सहभाग असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. राज्यातील वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार आणि शेतकरी प्रश्नांवरही सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी येत्या अधिवेशनात हे सर्व मुद्दे आक्रमकपणे मांडणार असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील जनता योग्य वेळी या सरकारचा हिशोब चुकता करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला