Desk | Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray यांनी जनगणना प्रक्रिया, मतदार याद्या आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गंभीर चिंता व्यक्त करत पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्र सैनिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आणि आगामी काळात अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे सांगितले. राज ठाकरे म्हणाले की, केवळ आंदोलने आणि राजकीय भूमिका घेऊन चालणार नाही. आंदोलन जनतेच्या घरापर्यंत पोहोचते, मात्र ते मतपेटीपर्यंत पोहोचत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राला जगात आदर्श ठरेल असे राज्य बनवण्याचे स्वप्न आपण अनेक वर्षांपासून पाहत आहोत, मात्र त्यासाठी राजकीय सत्ता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले भाषणादरम्यान त्यांनी आगामी जनगणना प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जनगणना आणि घरगणनेच्या कामादरम्यान काही ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांसोबत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दिसल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रक्रियेदरम्यान नागरिकांच्या राजकीय भूमिकेची माहिती गोळा केली जात असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांनी सांगितले की, घरगणना किंवा जनगणना करताना कोणाच्या घरी जात आहेत,
कोणती माहिती घेत आहेत आणि तिचा भविष्यात कसा वापर होऊ शकतो, याकडे नागरिकांनी बारकाईने लक्ष दिले पाहिजे. मतदार याद्यांमधील नावांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. दुबार मतदारांची नावे कमी करण्याच्या प्रक्रियेत काही नागरिकांचे मतदानाचे अधिकार धोक्यात येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला. त्यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना जनगणना प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. आगामी निवडणुकांसाठी अजून वेळ आहे असे समजून निष्काळजी राहू नका, असे आवाहन त्यांनी केले. तीन वर्षांच्या कालावधीत अनेक महत्त्वाचे बदल घडू शकतात आणि त्याचा थेट परिणाम निवडणुकांवर होऊ शकतो, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी देशातील स्थलांतरित मतदारांचाही मुद्दा उपस्थित केला. एका राज्यातील नागरिक दुसऱ्या राज्यात वास्तव्यास असल्यास त्यांच्या मतदानाच्या अधिकारांबाबत कोणती भूमिका घेतली जाणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काही लोक एका राज्यात मतदान करून दुसऱ्या राज्यातही मतदान करतात, अशा आरोपांचाही त्यांनी उल्लेख केला. राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करत कार्यकर्त्यांना अधिक संघटित आणि जागरूक राहण्याचे आवाहन केले. विरोधी पक्षांनी निवडणूक व्यवस्थेतील त्रुटींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. भाषणाच्या शेवटी त्यांनी सत्तेचा अमरपट्टा कोणालाही मिळालेला नसतो, असे सांगत काँग्रेस पक्षाचे उदाहरण दिले. अनेक दशकांपर्यंत देशावर राज्य केलेल्या काँग्रेसची आजची परिस्थिती पाहता कोणतीही सत्ता कायमस्वरूपी नसते, असे ते म्हणाले. त्यामुळे जनतेचा विश्वास टिकवणे आणि लोकशाही प्रक्रियेचे संरक्षण करणे हे सर्व पक्षांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
