Top 5 This Week

Related Posts

BREAKING

NAGPUR : विद्यार्थ्याला नीट परीक्षेसाठी अबुधाबी केंद्र.

Desk | Nagpur

देशभरात होणाऱ्या नीट (NEET) फेर परीक्षेपूर्वी एक धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. नागपूरच्या एका विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रासाठी भारतातील शहरांऐवजी थेट संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) अबुधाबी केंद्र देण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून एनटीएच्या (National Testing Agency) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अब्दुल्ला नावाच्या विद्यार्थ्याने परीक्षा अर्ज भरताना नागपूर, वर्धा आणि भंडारा या केंद्रांचा पर्याय निवडला होता. मात्र प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. विद्यार्थ्याला नागपूर किंवा आसपासच्या कोणत्याही केंद्राऐवजी थेट अबुधाबी येथे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. परदेशातील केंद्र मिळाल्याने विद्यार्थ्याच्या परीक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. विद्यार्थ्याचे वडील सांगतात की, प्रवेशपत्र पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने एनटीएच्या हेल्पलाइनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक वेळा फोन लावूनही संपर्क होत नव्हता. काही क्रमांक सतत व्यस्त होते. अखेर एका क्रमांकावर संपर्क झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना ई-मेलद्वारे तक्रार नोंदवण्यास सांगितले.

त्यानुसार विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी सर्व माहिती पाठवत अधिकृत तक्रार केली. तक्रारीनंतर एनटीएकडून प्रतिसाद मिळाला आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ही चूक त्यांच्या स्तरावरून झाल्याचे मान्य केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. तसेच नवीन प्रवेशपत्र जारी करण्याचे आश्वासनही देण्यात आले. मात्र निश्चित वेळेत सुधारित प्रवेशपत्र मिळेल की नाही, याबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण कायम होते. या घटनेमुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. नीट परीक्षा ही वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अशा परिस्थितीत परीक्षा केंद्राच्या वाटपातील अशा प्रकारच्या चुका विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम करू शकतात. अनेक महिने मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रशासकीय त्रुटी मानसिक तणाव वाढवणाऱ्या ठरत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे एनटीएच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा टीका होत आहे. गेल्या काही वर्षांत परीक्षा प्रक्रियेतील विविध तांत्रिक अडचणी, प्रश्नपत्रिका गळतीच्या आरोपांपासून ते परीक्षा केंद्र वाटपातील त्रुटीपर्यंत अनेक वाद समोर आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे की, अशा चुका टाळण्यासाठी परीक्षा संस्थांनी अर्ज पडताळणी आणि केंद्र वाटप प्रक्रियेत अधिक काटेकोरपणा बाळगणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही निष्काळजीपणा परवडणारा नाही. सध्या एनटीएकडून विद्यार्थ्याला सुधारित प्रवेशपत्र देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या घटनेमुळे परीक्षा व्यवस्थापनातील त्रुटी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या असून विद्यार्थी आणि पालक अधिक जबाबदार व पारदर्शक व्यवस्थेची मागणी करत आहेत.