Desk | Buldhana
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, अद्याप राज्य सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. सरकारच्या या भूमिकेविरोधात बुलढाणा जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी नांदुरा-बुरहानपूर मार्गावरील खांडवी पाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सकाळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी खांडवी पाटा येथे एकत्र जमले. “शेतकऱ्यांना न्याय द्या” रोहित पवारांच्या मागण्या मान्य करा”, “सरकारचा निषेध असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. जवळपास एक तास नांदुरा-बुरहानपूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले असताना सरकार मात्र त्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले असतानाही शासनाने त्याची साधी दखल घेतलेली नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रोहित पवार यांच्या संघर्षाचे कौतुक करत, “रोहित दादा शेतकऱ्यांसाठी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता लढत आहेत. त्यांच्या या लढ्याला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. आता प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की त्यांनी या आंदोलनामागे ठामपणे उभे राहावे,” असे सांगितले. दरम्यान, रोहित पवार यांच्या वडिलांनीही आपल्या मुलाच्या आंदोलनाबाबत भावना व्यक्त करत, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तो लढत आहे. आता समाजानेही त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,” असे आवाहन केल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. रास्ता रोको आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली. आंदोलनकर्त्यांनी सरकारला इशारा देताना सांगितले की, “जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्या तातडीने मान्य करण्यात आल्या नाहीत, तर राज्यभर अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार पूर्णपणे जबाबदार असेल.” रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनामुळे राज्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. सरकार या आंदोलनाची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेणार की संघर्ष आणखी तीव्र होणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे
