Desk | Nagpur
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडत सर्व तर्क-वितर्क फेटाळून लावले. “आदरणीय शरद पवार साहेब, जयंत पाटील, शशिकांत शिंदे किंवा पक्षातील कोणत्याही नेत्याकडे विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही कोणालाही असा प्रस्ताव दिलेला नाही,” असे सुळे यांनी स्पष्ट केले. विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत विचारले असता, “राजकारणात वेगवेगळ्या पक्षांतील नेते विविध कामांसाठी एकमेकांना भेटत असतात. त्यामागे राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही,” असे त्या म्हणाल्या. संजय राऊत यांनी राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असे केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुळे
म्हणाल्या, “संजय राऊत हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. मोठ्या भावाला सूचना करण्याचा अधिकार असतो, मात्र पक्षाचा निर्णय पक्ष नेतृत्वच घेते.” देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. “आज देश आर्थिक, सामाजिक आणि राजकीय आव्हानांना सामोरे जात आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि नीट परीक्षेतील गोंधळ यांसारख्या गंभीर प्रश्नांवर लक्ष देण्याची गरज आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांनी केवळ राजकारण न करता जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे,” असे त्या म्हणाल्या. रोहित पवार यांच्या उपोषणाबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. “मी रोहितला उपोषण करू नको असे सांगितले होते. मात्र, शेतकऱ्यांसाठी लढण्याची त्याची भावना प्रामाणिक आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अधिक संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर सुळे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पक्ष फोडण्याचे राजकारण आम्ही कधी केले नाही आणि करणारही नाही. सध्या आमचे संपूर्ण लक्ष जनतेच्या प्रश्नांवर आहे.” सुप्रिया सुळे यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. त्यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत कोणतीही संदिग्धता न ठेवता स्पष्ट संदेश दिला की, जनतेचे प्रश्न सोडवणे हेच पक्षाचे प्राधान्य आहे. विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी केवळ अफवा असल्याचे सांगत राजकीय वर्तुळातील चर्चांना नवे वळण दिले आहे.
