Desk | Amravati
राज्यातील सरकारी आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये चक्क एकाच बेडवर दोन रुग्णांना झोपवून उपचार करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांच्या गुणवत्तेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. समोर आलेल्या दृश्यांमध्ये एकाच बेडवर दोन रुग्ण उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही रुग्णांच्या हातात सलाईन लावण्यात आलेली असून, अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत त्यांना उपचार घ्यावे लागत आहेत. काही रुग्णांच्या नाकात ऑक्सिजनची नळी असतानाही त्यांना व्यवस्थित झोपताही येत नसल्याचे दिसून आले. उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना अशा अवस्थेत दिवस काढावे लागत असल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्येही संतापाचे वातावरण आहे.
रुग्णालयातील बेडची कमतरता, वाढती रुग्णसंख्या आणि अपुऱ्या सुविधा यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे सांगितले जात आहे. आरोग्य सेवेच्या नावाखाली रुग्णांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. “एकाच बेडवर दोन रुग्ण” हे चित्र केवळ एका रुग्णालयाचे वास्तव नसून संपूर्ण सरकारी आरोग्य व्यवस्थेची विदारक स्थिती दर्शवणारे असल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी अकोल्यातील शासकीय रुग्णालयात स्ट्रेचर उपलब्ध नसल्यामुळे एका महिलेला आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयात दाखल करावे लागल्याची घटना समोर आली होती. त्या घटनेमुळे प्रशासनावर टीकेची झोड उठली असतानाच आता अमरावतीतील हा प्रकार समोर आल्याने आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, वॉर्डमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी एकाच बेडजवळ दोन सलाईन स्टँड लावलेले दिसून येत असून, रुग्णांना हालचाल करण्यासाठीही पुरेशी जागा नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत संसर्गाचा धोका वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिक उपचारासाठी येत असतात. मात्र, त्यांनाच अशा अमानवी परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाकडून आरोग्य सुविधांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असला, तरी प्रत्यक्षात रुग्णालयांमधील सुविधा कितपत सक्षम आहेत, हा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन तातडीने परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावीत, अतिरिक्त बेडची व्यवस्था करावी आणि रुग्णांना सन्मानाने व सुरक्षित वातावरणात उपचार मिळतील याची खात्री करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
