Desk | Gondia
मुंबईत राज्यसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार राजेंद्र जैन यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह महायुतीतील अनेक नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजेंद्र जैन यांनी छगन भुजबळ यांना वाकून नमस्कार केल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले गेले. राज्यसभा उमेदवारीवरून पक्षात मतभेद असल्याच्या चर्चांदरम्यान जैन यांच्या या कृतीकडे विशेष राजकीय संदेश म्हणून पाहिले जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राजेंद्र जैन यांनी पक्षात कोणताही सुप्त संघर्ष नसल्याचे ठामपणे सांगितले. “मी छगन भुजबळ साहेबांना नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद घेतला.
यामध्ये कोणताही वेगळा अर्थ काढण्याचे कारण नाही. पक्षाने एकमताने माझ्या उमेदवारीचा निर्णय घेतला आहे. संघर्ष किंवा नाराजीच्या चर्चा केवळ अफवा आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले. जैन यांनी पुढे सांगितले की, पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते एकत्रितपणे निर्णय घेतात आणि राज्यसभा मेदवारीबाबतही तसाच निर्णय घेण्यात आला आहे. “आदरणीय अजितदादा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील तसेच पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे मला उमेदवारी मिळाली आहे. हा संपूर्ण पक्षाचा निर्णय आहे, कोणत्याही एका व्यक्तीचा नाही,” असे ते म्हणाले. राज्यसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ यांचे नाव देखील चर्चेत होते. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही राजकीय वर्तुळांमध्ये नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र अर्ज दाखल करताना भुजबळ स्वतः उपस्थित राहिले आणि जैन यांनी त्यांना नमस्कार करत आशीर्वाद घेतल्याने त्या चर्चांना मोठ्या प्रमाणात पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. राजेंद्र जैन हे विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांनी पक्ष संघटना उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून विधान परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. विदर्भाला राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळावे, या भूमिकेतून पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि दिसलेली एकजूट ही आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. पक्षामध्ये कोणतेही मतभेद नसून सर्वजण एकत्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे
