Top 5 This Week

Related Posts

BREAKING

MAHARASHTRA : ‘ती’ महिला कोण? गूढ कायम!

बुलढाणा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या कथित शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र, या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा अद्यापही अनुत्तरितच आहे. ज्या अनोळखी महिलेचा मृतदेह या प्रकरणात सापडला होता, तिची ओळख अद्याप पटलेली नसल्याने पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्याला भेट देत तपासाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तपासाची सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत कोणती पावले उचलली,

मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी काय प्रयत्न केले आणि तपास नेमका कोणत्या टप्प्यावर आहे, यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. जयश्री शेळके यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत राज्यातील पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की, पोलीस यंत्रणा अनेक ठिकाणी मनमानी पद्धतीने काम करत असून त्यामुळेच अशा प्रकारच्या गंभीर घटनांमध्ये तपासाला विलंब होत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे बुलढाणा जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली असून सत्य बाहेर येणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या प्रकरणात राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तपासाची दिशा स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. तपास अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाखाली न येता निष्पक्ष, पारदर्शक आणि वेगवान चौकशी करावी, जेणेकरून मृत महिलेची ओळख पटेल आणि संपूर्ण प्रकरणातील सत्य जनतेसमोर येईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, महिनाभर उलटल्यानंतरही मृत महिलेची ओळख पटलेली नसल्यामुळे या प्रकरणाभोवतीचे गूढ अधिकच गडद होत आहे. पोलिसांच्या तपासातून पुढे कोणती नवी माहिती समोर येते आणि या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे कधी मिळतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.