डेस्क | नागपूर
नागपूर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell) नागपूर-भंडारा महामार्गावर एक मोठी कारवाई करत आंतरराज्यीय गांजा तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 34 किलो गांजासह, एक मोठा कंटेनर आणि कार असा एकूण 29 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, 6 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
उमिया कॉम्प्लेक्ससमोर रंगेहात पकडले
मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस गुरुवारी संध्याकाळी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान, शिवमंदिराजवळ उभ्या असलेल्या एका उत्तर प्रदेश पासिंगच्या कंटेनरमधून (UP 81 / ET 9004) एमएच 31 पासिंगच्या कारमध्ये (MH 31 / FC 8838) काहीतरी संशयास्पद मालाची देवाणघेवाण सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ उमिया कॉम्प्लेक्ससमोर वेढा घातला आणि वाहनांची झडती घेतली. यावेळी कार आणि कंटेनरमधून 34 किलो गांजा जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
पोलिसांनी घटनास्थळावरून खालील 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे: 1. सय्यद सुमेल सय्यद इस्माईल (वय २९, रा. कामठी, नागपूर) 2. मोहम्मद अनस सय्यद हिदायतुल्ला (वय 25, रा. हिंगणा रोड, नागपूर) 3. रवी उदयसिंग शाहू (वय 30, रा. हिंगणा रोड, नागपूर) 4. अनिकेत गजानन गायनेर (वय 27, रा. गजाननगर) 5. अमन निमराज गायधने (वय 27, रा. संजयनगर) 6. आकाश संजय विठोले (वय 27, रा. आंधळगाव, भंडारा)
ओडिशा कनेक्शन आले समोर; मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी हा गांजा ओडिशा येथील विजयकुमार बहेरा (रा. संभलपूर, ओडिशा) नावाच्या मुख्य तस्कराकडून आणल्याची कबुली दिली आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि नागपुरात मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यासाठी हा गांजा आणला जात होता.
29 लाखांचा मुद्देमाल जप्त
या धडक कारवाईत अमली पदार्थ विरोधी पथकाने पुढील मुद्देमाल जप्त केला आहे:
-
34 किलो गांजा
-
1 कंटेनर ट्रक
-
1 कार
-
8 मोबाईल फोन्स (एकूण किंमत: 29 लाख 5 हजार रुपये)
पारडी पोलीस ठाण्यात या सर्व आरोपींविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आता ओडिशातील मुख्य सूत्रधार विजयकुमार बहेरा याच्या अटकेसाठी पुढील तपास करत आहेत.
