Top 5 This Week

Related Posts

Hingnghat : भीषण अपघात, पती-पत्नीचा जागीच मृत्यू, 4 वर्षांची चिमुकली गंभीर

डेस्क | हिंगणघाट

एका लग्नकार्याहून आनंदाने घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. हिंगणघाट येथील कुटीर रुग्णालयाजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची चार वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणघाट येथील इंदिरा गांधी वॉर्डातील रहिवासी यादवराव बापूराव सलाम (35), त्यांच्या पत्नी विद्या यादवराव सलाम (27) आणि मुलगी पूर्वा यादवराव सलाम (4) हे मंगळवारी (12 मे) वरोरा येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. लग्न आटोपून सायंकाळी आपल्या ‘स्कुटी’ने (क्र. MH 32 W 2265) हिंगणघाटला परत येत असताना, रात्री  वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

कुटीर रुग्णालयाजवळून शिवाजी मार्केटच्या दिशेने वळण घेत असताना, नागपूरकडून हैदराबादकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने (क्र. HR 47 H 4726) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

हृदयद्रावक दृश्य

धडक इतकी भीषण होती की, यादवराव आणि विद्या हे दोघेही ट्रकच्या मागील चाकाखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने, त्यांची चार वर्षांची मुलगी पूर्वा ही बाजूला फेकली गेल्याने तिचा जीव वाचला, मात्र ती गंभीररीत्या जखमी झाली आहे.

रुग्णालयात उपचार आणि फरार चालक

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी असलेल्या पूर्वाला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त ट्रक जागीच सोडून चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अपघाताचे कारण आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा

या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. अपघाताची मुख्य कारणे खालीलप्रमाणे सांगितली जात आहेत:

  • अपूर्ण बांधकाम: गेल्या अनेक दिवसांपासून कलोड चौक ते कुटीर रुग्णालयापर्यंत पुलाचे बांधकाम सुरू आहे, ज्यामुळे वाहतूक एकेरी करण्यात आली आहे.

  • वाहतूक पोलिसांचा अभाव: हा राष्ट्रीय महामार्ग असूनही आणि परिसरात मोठी नागरी वस्ती असतानाही, वाहतूक नियंत्रित करण्यासाठी येथे एकही वाहतूक पोलीस तैनात नव्हता.

  • अतिवेग: महामार्गावरून धावणाऱ्या जड वाहनांचा अतिवेग निष्पाप नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.

एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा अंत झाल्याने हिंगणघाट परिसरात शोककळा पसरली आहे.