DESK | CHAMORSHI
चामोर्शी तालुक्यातील वेलतूर तुकूम येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका 41 वर्षीय विवाहित तरुणाने आपल्याच शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवार, 11 मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण गाव आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अंबादस ज्ञानीराज देशमुख (वय 41 वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अंबादास यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गावाजवळच असलेल्या स्वतःच्या शेतात जाऊन टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी शेतातील एका आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोरखंड बांधून गळफास घेतला.
सोमवारी सकाळी गावकरी आणि शेतकरी जेव्हा शेताकडे गेले, तेव्हा अंबादास यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली.
कौटुंबिक पार्श्वभूमी
अंबादास यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी त्यांची पत्नी शिला अंबादास देशमुख या आपल्या दोन मुलांसह गेल्या 10 दिवसांपासून माहेर असलेल्या चाकलपेट येथे वास्तव्यास होत्या. घरात कुणीही नसताना अंबादास यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पोलीस तपास आणि पंचनामा
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील मुकुंदा सुरकर यांनी तत्काळ चामोर्शी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली भेंडाळा बीटचे हवालदार पाल व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
चामोर्शी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आत्महत्येमागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका उमद्या व्यक्तीने अशा प्रकारे जीवन संपवल्यामुळे वेलतूर तुकूम परिसरात सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.
