DESK | ULHASNAGAR
कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील एका कैद्याने सोमवारी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात प्रचंड गोंधळ घातला. पुन्हा तुरुंगात जावे लागू नये आणि रुग्णालयातच राहता यावे, या वेड्या हट्टापायी या कैद्याने रुग्णालयातील केबिनच्या काचा फोडून स्वतःला जखमी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे रुग्णालयातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आदिब इस्तियाक अन्सारी हा कैदी कल्याणच्या आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत आहे. सोमवारी त्याने पोटदुखीची तक्रार केली होती. त्यानंतर कारागृह प्रशासनाने त्याला पोलीस बंदोबस्तात उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणले.
डॉक्टरांनी अन्सारीची प्राथमिक तपासणी केली आणि त्याला किरकोळ त्रास असल्याचे सांगून पुन्हा तुरुंगात नेण्याची सूचना पोलिसांना दिली. मात्र, अन्सारीला कारागृहात परत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्याला कोणत्याही परिस्थितीत रुग्णालयातच भरती व्हायचे होते.
रुग्णालयात घातला धिंगाणा
जेव्हा पोलिसांना त्याला परत नेण्याची तयारी सुरू केली, तेव्हा रागाच्या भरात अन्सारीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याने केबिन नंबर १३ च्या दिशेने धाव घेतली आणि स्वतःच्या डोक्याने खिडकीची काच फोडली. काच फोडून त्याने एक प्रकारे स्टंटबाजी करण्याचा आणि पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट
या अचानक घडलेल्या प्रकारामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली. दोन दिवसांपूर्वीच एका मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी याच रुग्णालयात तोडफोड केली होती, त्यामुळे कर्मचारी आधीच तणावात होते. त्यातच या कैद्याच्या कृत्यामुळे भीतीचे सावट अधिकच गडद झाले. सुदैवाने, या घटनेत इतर कोणत्याही रुग्णाला किंवा रुग्णालयीन कर्मचाऱ्याला दुखापत झाली नाही.
प्रशासकीय पावले आणि कारवाई
घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी कारागृह प्रशासनाला लेखी पत्राद्वारे कळविले आहे की, या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपीला पुन्हा उपचारासाठी या रुग्णालयात पाठवू नका.
मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी माहिती दिली की, पोलिसांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. आरोपी अन्सारी याच्यावर शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, त्याला कडक ताकीद देण्यात आली आहे.
