Top 5 This Week

Related Posts

BREAKING

CHANDRAPUR : सुधीर मुनगंटीवारांचा मंदिर विकासासाठी पुढाकार!

Desk | Chandrapur

शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने भिवापूर वॉर्डातील पुरातन हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मंदिराचा ऐतिहासिक वारसा कायम ठेवत परिसराचे सुशोभीकरण आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याचे मंदिर परिसरात सादरीकरण करण्यात आले. यावेळी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संपूर्ण आराखड्याची पाहणी करून विविध बाबींचा आढावा घेतला. भिवापूर वॉर्डातील हे पुरातन हनुमान मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून चंद्रपूरच्या ऐतिहासिक आणि स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींशी जोडलेले महत्त्वाचे स्थळ आहे. या मंदिर परिसराला विशेष ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी याच परिसरातून इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यलढ्याचा एल्गार पुकारला होता. त्यांच्या या प्रेरणादायी आवाहनातून पुढे चिमूर क्रांतीची ठिणगी पेटली. त्यामुळे या मंदिराचे महत्त्व धार्मिकतेपुरते मर्यादित नसून स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातही त्याला विशेष स्थान आहे. याच ऐतिहासिक महत्त्वाचा विचार करून मंदिराचा जीर्णोद्धार करताना त्याचे प्राचीन वैभव आणि मूळ ओळख जपण्यावर भर देण्यात येणार आहे. मंदिर परिसर अधिक सुंदर, भव्य आणि भाविकांसाठी सुविधायुक्त करण्याच्या दृष्टीने आराखड्यात विविध विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे. या कामांची पाहणी करताना सुधीर मुनगंटीवार यांनी आराखड्यातील प्रत्येक बाबीची माहिती घेतली. तसेच मंदिराचे ऐतिहासिक स्वरूप अबाधित ठेवून विकासकामे

करण्याच्या दृष्टीने नियोजनाला महत्त्व दिले. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या हनुमान जयंतीला या कामाचे भूमिपूजन करण्याचा मानस व्यक्त केला. त्यामुळे मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मंदिराचा विकास करताना केवळ बांधकामावर भर न देता या परिसरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन होणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. चंद्रपूर शहराला ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. या वारशाचे जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत त्याचे महत्त्व पोहोचविणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू राहणे आवश्यक आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासह शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला. भिवापूर वॉर्डातील पुरातन हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचा हा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसराला नवे स्वरूप मिळण्यासोबतच चंद्रपूरच्या ऐतिहासिक ओळखीला उजाळा मिळण्यास मदत होणार आहे.