Desk | wardha
पवनार, प्रतिनिधी | शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करून बँकांच्या थकबाकी वसुलीचा मार्ग मोकळा केला. मात्र, कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. खरीप हंगाम संपत आला असताना नवीन पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतीच्या हंगामी कामांसाठी पैशांची गरज असताना बँकांकडून कर्जवाटपाला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. कर्जमाफी झाली, तरी नवीन कर्जासाठी प्रतीक्षा शासनाच्या कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जुन्या कर्जाचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला आहे. मात्र, कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन पीक कर्ज मिळण्याची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून प्रतीक्षा करावी लागत आहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेमुळे बँकांच्या खात्यांवरील थकबाकीची स्थिती बदलली असली, तरी नवीन कर्जवाटपासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे नवीन पीक कर्ज मंजूर करण्यास बँकांकडून असमर्थता दर्शविली जात असल्याचे चित्र आहे. खात्यावर केवळ १०० ते २०० रुपयांची थकबाकी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ १०० ते २०० रुपयांचीच थकबाकी शिल्लक असल्याचे समोर आले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी ही रक्कम भरण्याची तयारी दर्शविली असतानाही बँकांकडून नवीन पीक कर्ज मिळत नसल्याची तक्रार आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर्जमाफीपूर्वीची थकबाकी शासनाकडून भरली गेली आहे. मात्र, त्यानंतरही व्याजाची रक्कम खात्यावर कायम असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये अडचणी निर्माण होत असून नवीन कर्जवाटपाची प्रक्रिया रखडली आहे. जुन्या कर्जखात्यांमुळे नवीन कर्जवाटप रखडले जुन्या कर्जखात्यांवरील थकबाकी पूर्णपणे बंद झाल्याशिवाय नवीन पीक कर्जवाटपाची प्रक्रिया सुरू करता येत नसल्याचे बँक व्यवस्थापनाकडून सांगितले जात आहे. ही प्रक्रिया विभागीय पातळीवर पूर्ण करावी लागत असल्याने नवीन कर्ज मिळण्यास विलंब होत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक नागसेन म्हमणे यांनी सांगितले की, जुन्या कर्जखात्यांवरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नवीन पीक कर्जवाटप करता येईल. त्यामुळे संबंधित प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, कर्जमाफीची वसुली झाल्यानंतरही शेतकऱ्यांना नवीन कर्जासाठी बँकांच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने नाराजी वाढत आहे. कर्जमाफीचा लाभ मिळूनही नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. हंगामी खर्च भागवायचा कसा? खरीप हंगामातील शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेत पैशांची आवश्यकता असते. बियाणे, खते, औषधे तसेच शेतीच्या इतर खर्चांसाठी पीक कर्ज महत्त्वाचे ठरते. मात्र, कर्जवाटपाला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना या खर्चाचे नियोजन करताना अडचणी येत आहेत.
शेतकरी अनिल उमाटे यांनी सांगितले की, कर्जमाफीनंतर त्यांच्या खात्यात केवळ एक हजार रुपयांच्या व्याजाची थकबाकी दर्शविली जात आहे. ही रक्कम भरण्याची तयारी दर्शवूनही नवीन कर्ज देण्याची विनंती केली असता बँक व्यवस्थापनाकडून कर्ज मिळू शकत नसल्याचे सांगण्यात आले. खरीप हंगाम संपत आला असताना नवीन पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना हंगामी खर्च आणि घरखर्च कसा भागवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतरही नवीन कर्जासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
