Desk | latur
लातूर : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ६८२ शेतकरी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून, यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत आवश्यक रक्कम भरण्याची मुदत देण्यात आली आहे. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील ९२ हजार ३९१ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ७७ हजार ९९९ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४३३ कोटी ७८ लाख रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एकवेळ समझोता योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेत दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. मात्र, पात्र शेतकऱ्यांना योजनेच्या नियमानुसार स्वतःचा हिस्सा बँकेत जमा करावा लागणार आहे. त्यानंतर शासनाकडून मिळणारी लाभाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये शेतकऱ्यांचे नाव, गाव, कर्जखात्याचा तपशील, ३१ मार्च २०२६ अखेरची थकबाकी, समझोत्याप्रमाणे देय रक्कम, शेतकऱ्याने भरावयाचा हिस्सा आणि शासनाकडून मिळणारा लाभ याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी यादीतील आपला तपशील काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. लाभ मिळवण्यासाठी या प्रक्रिया पूर्ण करा पात्र शेतकऱ्यांनी सर्वप्रथम प्रसिद्ध झालेल्या यादीत आपले नाव आणि रकमेचा तपशील तपासावा. त्यानंतर आपल्या हिश्श्याची आवश्यक रक्कम संबंधित बँकेत जमा करावी. ओटीएसची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्रतेनुसार शासनाकडून मिळणारा लाभ थेट संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केला जाणार आहे.
३१ मार्च २०२७ अंतिम मुदत या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीत आवश्यक रक्कम बँकेत जमा करणे गरजेचे आहे. ३१ मार्च २०२७ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर बँकेशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे, रक्कम आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील ४ हजार ६८२ पात्र शेतकऱ्यांचे लक्ष आता या योजनेच्या अंमलबजावणीकडे लागले आहे.
