Top 5 This Week

Related Posts

BREAKING

BHANDARA : दिवाळी संपली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेच नाहीत !

Desk | bhandara

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर निधीला ब्रेक! सहा हजार रुपये मिळणार तरी कधी? धुळे (कांदळी) : आधीच दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट अधिकच गडद होताना दिसत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या मदतीच्या निधीला ब्रेक लागल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाकडून सहा हजार रुपयांचा निधी मिळणार असल्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात हा निधी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा करावी लागत असून, शासनाच्या घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नियमितपणे हप्ते मिळत असताना राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत मात्र शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या योजनेचे तीन हप्ते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक हप्त्यापोटी दोन हजार रुपये याप्रमाणे एकूण सहा हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे. मात्र, हा निधी रखडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. शेतीचा वाढता खर्च, बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचे वाढलेले दर यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच निसर्गाची अवकृपा आणि शेतीमालाच्या घसरत्या दरांचा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. अशा संकटाच्या काळात शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत वेळेवर मिळणे अपेक्षित असताना निधी रखडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मोहाडी तालुक्यातील धोप, जांभ, कांद्रीसह परिसरात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. धानपिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याशिवाय गुरांच्या पिण्याच्या पाण्याची उपलब्धताही अपुरी असल्याने पशुपालकांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. दिवाळीसारखा महत्त्वाचा सण उलटून गेला, मात्र अनेक शेतकऱ्यांच्या हातात पैसे नसल्याने त्यांना सणही अंधारात साजरा करावा लागला. शेतीच्या उत्पन्नावर संपूर्ण वर्षाचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे हे गणित पूर्णपणे बिघडले आहे. अशा वेळी शासनाच्या मदतीचा आधार मिळण्याऐवजी निधीची प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना धुसाळा येथील शेतकरी प्रवीण सेलोकर यांनी शासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठे नुकसान झाले असून, शेतीसाठी केलेला खर्चही आता निघणे कठीण झाले आहे.

शेतकऱ्यांची दिवाळीही पैशाअभावी अंधारात गेली. अशा संकटाच्या काळात शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे अपेक्षित होते. रखडलेले सहा हजार रुपये तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, अशी मागणी त्यांनी केली. एकीकडे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत असताना दुसरीकडे शासनाकडून अपेक्षित असलेली आर्थिक मदतही वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे रखडलेले तीनही हप्ते कधी मिळणार, याकडे मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.