Desk | wardha
यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली असून, व्यापाऱ्यांसाठी मात्र कापसाचा व्यवसाय फायदेशीर ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. कापूस उत्पादनाबाबत केलेले अंदाज आणि प्रत्यक्ष बाजारातील परिस्थिती यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. मागील काही वर्षांपासून कापूस उत्पादनाच्या अंदाजाबाबत तज्ज्ञांकडून मोठे दावे केले जात होते. यंदाही देशात कापसाचे उत्पादन भरघोस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात उत्पादनाच्या आकडेवारीत मोठी घट दिसून येत आहे. याचा परिणाम कापसाच्या बाजारपेठेवर झाला असून, शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळताना दिसत नाही. कापूस उत्पादनाचा अंदाज वर्तवणारी तज्ज्ञ मंडळी दरवर्षी डिसेंबर महिन्यात पहिला अंदाज जाहीर करतात. सुरुवातीला उत्पादन कमी होणार असल्याचे चित्र मांडले जाते. त्यामुळे देशातील सूतगिरण्यांना कच्च्या मालाची कमतरता भासेल, अशी चर्चा सुरू होते. याच पार्श्वभूमीवर कापूस आयातीची मागणी केली जाते. परिणामी, बाजारात कापसाचे दर दबावाखाली येतात आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो. 2025-26 मधील आकडेवारीने उघड केला अंदाजातील घोळ मागील 2025-26 हंगामातील आकडेवारी या परिस्थितीचे उदाहरण ठरत आहे. डिसेंबर महिन्यात देशात 310 लाख कापूस गाठींचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर जानेवारीत हा अंदाज 314 लाख, फेब्रुवारीत 320 लाख आणि मार्चमध्ये 321 लाख गाठींपेक्षा अधिक उत्पादन होईल, असा दावा करण्यात आला. मात्र, हंगामाच्या शेवटी प्रत्यक्ष उत्पादन तब्बल 332 लाख गाठींपर्यंत पोहोचल्याचे समोर आले. म्हणजेच सुरुवातीला कमी उत्पादनाचा अंदाज व्यक्त करून नंतर टप्प्याटप्प्याने आकडेवारी वाढवण्यात आली. प्रत्यक्ष उत्पादनाची अंतिम आकडेवारी समोर येईपर्यंत शेतकऱ्यांना मात्र कमी दरात कापूस विकण्याची वेळ आली होती. दुसरीकडे, व्यापाऱ्यांनी या परिस्थितीचा फायदा घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. बीजी-3 बियाण्यांच्या नोंदीचा मुद्दा ऐरणीवर यंदाच्या 2026-27 कापूस हंगामातही उत्पादन आणि पेरणीच्या आकडेवारीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. बाजारात विकल्या गेलेल्या बियाण्यांच्या नोंदींच्या आधारे कापसाचा पेरा आणि उत्पादन घटल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, या आकडेवारीत केवळ मान्यताप्राप्त बीजी-2 बियाण्यांच्या पाकिटांचा विचार करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्षात शासनाची परवानगी नसलेल्या बीजी-3 बियाण्यांची लाखो पाकिटे शेतकऱ्यांनी खरेदी करून लागवड केल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या बियाण्यांची लागवड विचारात घेतल्यास कापसाचा एकूण पेरा कमी झाल्याचे चित्र चुकीचे ठरू शकते. परिणामी, केवळ बाजारातील बियाणे विक्रीच्या नोंदींवर आधारित उत्पादनाचे अंदाज कितपत अचूक आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांना वास्तववादी आकडेवारीची अपेक्षा कापूस उत्पादनाच्या चुकीच्या अंदाजांमुळे बाजारपेठेत संभ्रम निर्माण होतो. त्याचा फायदा व्यापाऱ्यांना मिळत असताना शेतकऱ्यांना मात्र आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
उत्पादनाचे अंदाज जाहीर करताना सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष लागवडीचा विचार करणे आवश्यक आहे. केवळ व्यापारी आणि बाजारपेठेच्या दृष्टीने आकडेवारी मांडण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हिताचाही विचार व्हायला हवा. शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांनी कापूस उत्पादनाचे वास्तववादी आणि अचूक अंदाज जाहीर करावेत, अशी मागणी आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. अन्यथा आकडेवारीच्या या खेळात व्यापाऱ्यांची दिवाळी होत राहील आणि बळीराजाच्या वाट्याला मात्र आर्थिक संकटच येत राहील.
