Desk | Nagpur
नागपूर महानगरपालिकेतील दुर्बल घटक समितीच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांना निधी आणि प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेमुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शहरातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि बौद्ध वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राखीव असलेल्या निधीचा पुरेसा उपयोग होत नसल्याने अनेक नगरसेवकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, ९० हून अधिक नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी अद्याप अपेक्षित निधी मिळालेला नाही. चालू आर्थिक वर्षात प्रभागातील विकासकामांसाठी दुर्बल घटक समितीला सुमारे ३९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, यातील काही निधी जुन्या कामांसाठी राखीव असल्याने प्रत्यक्षात नवीन कामांसाठी उपलब्ध असलेल्या निधीवर मर्यादा आल्या आहेत. सध्या सुमारे २४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, तब्बल ५५ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याने निधी आणि मंजूर कामांमध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून दुर्बल घटक समितीमार्फत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि बौद्ध वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पातील ७ ते १० टक्के निधी राखीव ठेवला जातो
या निधीतून संबंधित वस्त्यांमध्ये रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि इतर आवश्यक विकासकामे केली जाणे अपेक्षित आहे. मात्र, निधी उपलब्ध असूनही मंजूर कामांची प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याने विकासकामांचा वेग मंदावला आहे. वर्क ऑर्डरच्या विलंबाने नगरसेवक त्रस्त महापालिकेच्या वर्क मॉड्यूलबाबत नगरसेवकांमध्ये नाराजी वाढत आहे. ऑनलाइन फाईल पडताळणीच्या प्रक्रियेत अनेक प्रस्ताव अडकून पडत असल्याची तक्रार आहे. विकासकामांना मंजुरी मिळाल्यानंतरही संबंधित कामांच्या वर्क ऑर्डर वेळेत जारी केल्या जात नाहीत. काही कामांच्या वर्क ऑर्डर तीन-तीन महिने उलटूनही निघत नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. स्थायी समिती आणि दुर्बल घटक समितीकडे फाईल मंजुरीचे अधिकार असतानाही प्रशासकीय स्तरावर कामांना विलंब होत असल्याचे चित्र आहे. परिणामी, प्रभागातील नागरिकांना आवश्यक असलेल्या विकासकामांसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत आहे. रस्ते, गटारे आणि इतर मूलभूत सुविधांची कामे रखडल्याने नागरिकांमध्येही नाराजी वाढत आहे. आयुक्तांच्या भेटीनंतरही प्रश्न कायम या समस्यांमुळे संतप्त झालेल्या काही नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन विकासकामांमधील विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. मंजूर कामांच्या वर्क ऑर्डर तातडीने काढण्यात याव्यात आणि निधीचा योग्य वापर व्हावा, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, दुर्बल घटकांच्या विकासासाठी राखीव असलेल्या निधीचा वेळेत उपयोग न झाल्यास अनेक महत्त्वाची कामे पुढील आर्थिक वर्षापर्यंत रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ९० हून अधिक नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांचा प्रश्न गंभीर बनला आहे. निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामे सुरू होत नसतील, तर या मंजुरीचा नागरिकांना काय फायदा, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वर्क ऑर्डर आणि ऑनलाइन फाईल मंजुरीची प्रक्रिया वेगवान करून विकासकामे तातडीने सुरू करावीत, अशी अपेक्षा नगरसेवकांकडून व्यक्त केली जात आहे.
