कुंभमेळा म्हटलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर येतात ते अंगाला भस्म लावलेले, जटाधारी आणि हातात त्रिशूळ घेतलेले नागा साधू. कुंभमेळ्यात त्यांच्या उपस्थितीला विशेष महत्त्व असतं. मात्र, सामान्य जगापासून दूर राहणारे हे नागा साधू नेमके कोण असतात? ते वस्त्र का परिधान करत नाहीत? नागा साधू बनण्याची प्रक्रिया काय असते आणि कुंभमेळा संपल्यानंतर ते कुठे जातात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांच्या रहस्यमयी जीवनात दडलेली आहेत. नागा शब्दाचा नेमका अर्थ काय? ‘नागा’ या शब्दाच्या उत्पत्तीबाबत दोन प्रमुख व्युत्पत्ती सांगितल्या जातात. पहिली म्हणजे ‘नग्न’, अर्थात वस्त्रहीन राहणारे आणि दुसरी म्हणजे पर्वतांवर राहणारे. या दोन्ही अर्थांचा संबंध नागा साधूंच्या जीवनशैलीशी जोडला जातो. ऐतिहासिक मान्यतेनुसार, आठव्या शतकात आद्य शंकराचार्य यांनी हिंदू धर्म आणि मंदिरांच्या रक्षणासाठी विविध आखाड्यांची स्थापना केली. या आखाड्यांमध्ये धार्मिक ज्ञानासोबतच युद्धकलेचे प्रशिक्षण घेतलेले साधू तयार करण्यात आले. शास्त्र आणि शस्त्र या दोन्ही क्षेत्रांत पारंगत असलेल्या साधूंना नागा साधू म्हणून ओळख मिळाली. नागा साधू बनण्याची प्रक्रिया अत्यंत कठीण! कोणीही एका रात्रीत नागा साधू बनू शकत नाही. त्यासाठी अनेक वर्षांची कठोर साधना, तपश्चर्या आणि शिस्त पाळावी लागते. साधारणपणे १२ ते १७ वर्षांच्या दीर्घ प्रक्रियेचा उल्लेख केला जातो. या काळात साधकाला आखाड्यात राहून ब्रह्मचर्य पाळावे लागते आणि आपल्या गुरूंची सेवा करावी लागते. या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा आणि कठीण टप्पा म्हणजे स्वतःचे जिवंतपणी पिंडदान करणे. या धार्मिक विधीचा अर्थ असा की साधक आपल्या जुन्या आयुष्याचा, कुटुंबाचा, सामाजिक ओळखीचा आणि भौतिक अस्तित्वाचा त्याग करतो. यानंतर विविध धार्मिक विधी, हवन आणि गुरूंकडून दीक्षा दिली जाते. या प्रक्रियेनंतर साधक आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे समर्पित होतो. त्याच्यासाठी हा नव्या जन्माचा प्रारंभ मानला जातो. नागा साधू वस्त्र का परिधान करत नाहीत? नागा साधूंच्या जीवनातील सर्वात वेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची वस्त्रहीन राहण्याची परंपरा. काही नागा साधू दिगंबर स्वरूपात राहतात. त्यांच्या मते निसर्ग आणि दहा दिशा हेच त्यांचे वस्त्र आहेत. काम, क्रोध, मोह आणि लज्जा यांसारख्या भावनांच्या पलीकडे जाण्याचा हा त्यांच्या साधनेचा एक भाग मानला जातो. शरीराचे संरक्षण करण्यासाठी ते अंगाला भस्म म्हणजेच राख लावतात. भस्म हे त्यांच्या धार्मिक श्रद्धेचे आणि वैराग्याचे प्रतीक आहे. मात्र, सर्वच नागा साधू नेहमी वस्त्रहीन असतात असे नाही. काही साधू वस्त्रांचाही वापर करतात. कुंभमेळ्यानंतर कुठे गायब होतात नागा साधू? कुंभमेळा संपल्यानंतर नागा साधू अचानक सामान्य लोकांच्या नजरेआड होतात. त्यामुळे ते नेमके कुठे जातात, याबाबत अनेकांना उत्सुकता असते. काही साधू हिमालयातील गुहा, दुर्गम पर्वतीय भाग आणि जंगलांमध्ये साधनेसाठी जातात. तर काही आखाड्यांच्या मठांमध्ये आणि धार्मिक पीठांमध्ये वास्तव्यास असतात. ते वर्षभर केवळ कुंभमेळ्याची वाट पाहत असतात असे नाही. विविध धार्मिक कार्यक्रम, आखाड्यांच्या परंपरा आणि गुरूंच्या भेटीगाठींसाठी त्यांचे एकत्र येणे सुरू असते. कुंभमेळा हा मात्र त्यांच्यासाठी सर्वात मोठा धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळा असतो. एकूणच, नागा साधूंचे जीवन हे त्याग, तपश्चर्या, शिस्त आणि अध्यात्म यांवर आधारित आहे. भौतिक सुखांचा त्याग करून साधनेचा मार्ग स्वीकारणारे नागा साधू भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण अंग मानले जातात. त्यांच्या जीवनशैलीमागील श्रद्धा, परंपरा आणि साधना आजही सर्वसामान्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरते.
