Desk | amravati
अमरावतीसह राज्यातील अनेक भागांत पावसाने मोठी ओढ दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. जवळपास दीड महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या शेंगा पूर्णपणे भरल्या नसून दाणे बारीक राहिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. मात्र बाजारात दाखल होणाऱ्या सोयाबीनची अवस्था पाहता पावसाअभावी पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे. सोयाबीनचे दाणे बारीक, कमी भरलेले आणि वेगवेगळ्या आकाराचे दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसाच्या खंडामुळे सोयाबीनचा अपेक्षित भरणा झाला नाही आणि त्याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला आहे. सामान्य परिस्थितीत एकरी चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा असते. मात्र यंदा काही शेतकऱ्यांना केवळ तीन ते पाच क्विंटलपर्यंतच उत्पादन मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लागवड, फवारणी, काढणी आणि मळणीचा खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. अमरावतीतील एका शेतकऱ्याने सांगितले की, त्यांच्याकडे आठ ते नऊ एकर शेती असून सध्या दोन एकरातील सोयाबीन काढून बाजारात आणले आहे. या दोन एकरांसाठी सुमारे 40 हजार रुपयांचा खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र उत्पादन अत्यल्प असल्याने खर्चाच्या तुलनेत मोठा तोटा होण्याची शक्यता आहे. सोयाबीनला योग्य भाव मिळाला तर काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यंदा सोयाबीन पिकावर रोगराईचाही मोठा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना अनेकदा फवारण्या कराव्या लागल्या. एका शेतकऱ्याने तीन फवारण्या केल्याचे सांगितले. त्यामुळे उत्पादन खर्च आणखी वाढला आहे. त्यातच पावसाअभावी सोयाबीनचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. याचबरोबर सोयाबीननंतर घेतल्या जाणाऱ्या तूर पिकाबाबतही शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. पावसाचा अभाव कायम राहिल्यास तुरीच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे दसरा आणि दिवाळीसारखे सण तोंडावर आले आहेत. सोयाबीन विकून मिळणाऱ्या पैशातून अनेक शेतकरी सणासुदीचा खर्च भागवतात. मात्र यंदा उत्पादनच हातात न आल्याने दिवाळी अंधारात जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
दरम्यान, काही भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असली तरी संबंधित शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या भागात अद्याप पंचनामे झालेले नाहीत. नुकसानाच्या तुलनेत सरकारने पुरेशी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. एकीकडे उत्पादनात मोठी घट, दुसरीकडे वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील दराबाबतची अनिश्चितता, या तिहेरी संकटात सोयाबीन उत्पादक शेतकरी अडकला आहे. त्यामुळे सरकारकडून नुकसानभरपाई आणि योग्य आर्थिक मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
