Desk | Nagpur
जातनिहाय जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम असावा, या मागणीने महाराष्ट्रात पुन्हा जोर धरला आहे. सकल ओबीसी महामोर्चा, महाराष्ट्र राज्याच्या वतीने या मागणीसाठी महाराष्ट्रव्यापी तालुकास्तरीय सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 2 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता राज्यातील विविध तालुक्यांमध्ये या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनीही ओबीसींच्या स्वतंत्र नोंदणीच्या मागणीला सातत्याने पाठिंबा दिला आहे. त्यांच्या मते, जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असणे आवश्यक आहे. ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या समोर आली, तर सामाजिक न्याय, प्रतिनिधित्व आणि विविध कल्याणकारी योजनांच्या नियोजनासाठी अधिक स्पष्ट आकडेवारी उपलब्ध होऊ शकते, अशी त्यांची भूमिका आहे. सकल ओबीसी महामोर्चाने स्पष्ट केले आहे की, जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसींची स्वतंत्र आणि अचूक नोंद हा समाजाचा हक्क आहे. केवळ जनगणना करून उपयोग नाही, तर त्यामध्ये ओबीसींची स्वतंत्र नोंद होणे गरजेचे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यामुळे ओबीसी समाजाची
वास्तविक लोकसंख्या, सामाजिक परिस्थिती आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधित्व याबाबत अधिक अचूक माहिती उपलब्ध होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर विदर्भातून आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. 2 ऑक्टोबर रोजी तालुकास्तरावर सत्याग्रह केल्यानंतर 25 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय आंदोलन आणि मोर्चे आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी देशव्यापी ‘चलो दिल्ली’ आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांनी 19 सप्टेंबर रोजी नागपुरात झालेल्या ओबीसी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली होती. जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलम असला पाहिजे, ही आपली स्पष्ट मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. या मागणीसाठी राज्यभर आंदोलन उभारण्याची तयारी करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांना व्यापक स्वरूप देण्याच्या उद्देशाने या आंदोलनाची आखणी करण्यात आली आहे. विदर्भातील कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, आता संपूर्ण महाराष्ट्राने या आंदोलनासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, जातनिहाय जनगणनेतील ओबीसींच्या स्वतंत्र नोंदीचा मुद्दा सध्या महाराष्ट्रासह देशातील OBC संघटनांच्या आंदोलनाचा प्रमुख विषय बनला आहे. स्वतंत्र कॉलमच्या माध्यमातून ओबीसी समाजाची अचूक आकडेवारी समोर यावी आणि त्या आकडेवारीच्या आधारे सामाजिक व धोरणात्मक नियोजन करता यावे, अशी या आंदोलनामागील प्रमुख मागणी आहे. त्यामुळे आता 2 ऑक्टोबरचा तालुकास्तरीय सत्याग्रह, 25 ऑक्टोबरचे जिल्हास्तरीय आंदोलन आणि 1 नोव्हेंबरचे ‘चलो दिल्ली’ आंदोलन याकडे ओबीसी संघटना आणि राज्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
