Top 5 This Week

Related Posts

BREAKING

NANDED : शेतीवर संकट, शिक्षणाचाही प्रश्न; तरुण शेतकऱ्याने सांगितली व्यथा!

Desk | nanded

नांदेड तालुक्यातील मरळक बुद्रुक परिसरात पावसाने तब्बल पावणे दोन महिन्यांहून अधिक काळ ओढ दिल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, हळद यासह विविध पिकांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. मरळक बुद्रुक परिसरातील सोयाबीनच्या शेतांमध्ये पिकांची अपेक्षित वाढ झालेली नाही. पावसाअभावी सोयाबीनची वाढ खुंटली असून, अनेक झाडांना शेंगाच लागलेल्या नाहीत. काही झाडांना शेंगा लागल्या असल्या तरी त्यामध्ये दाणे भरलेले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. केवळ सोयाबीनच नव्हे, तर कापूस, तूर आणि हळद यांसारख्या इतर खरीप पिकांवरही पावसाच्या खंडाचा गंभीर परिणाम झाला आहे. काही पिके पूर्णपणे वाळून गेली असून, उर्वरित पिकेही खराब होण्याच्या स्थितीत आहेत. शेतकरी विठ्ठल गंगाराम यांनी सांगितले की, त्यांनी दोन ते अडीच एकर क्षेत्रात मोठा खर्च करून पेरणी केली. बियाणे, खत, मशागत आणि पेरणीसाठी खर्च केल्यानंतरही अपेक्षित पीक हातात येण्याची परिस्थिती नाही. सोयाबीनचे दाणे अत्यंत बारीक झाल्याने त्यातून उत्पादन मिळणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभराचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न आता त्यांच्यासमोर आहे. या परिसरातील तरुण शेतकरी संदीप भुक्ते यांनीही शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते, एवढा मोठा दुष्काळ त्यांनी यापूर्वी पाहिलेला नाही. पावसाअभावी आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. संदीप भुक्ते हे शेतीसोबत स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून, एमपीएससीची तयारी सुरू आहे. शिक्षणाचा खर्चही शेतीतूनच भागवावा लागत असल्याने पिकांचे नुकसान झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर किमान हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मागील वर्षी मिळालेली हेक्टरी 17 हजार रुपयांची मदत अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, खत, औषधे आणि शेतीच्या इतर निविष्ठांच्या वाढत्या दरांच्या तुलनेत शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच पावसाचा लांबलेला खंड आणि पिकांचे नुकसान यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. त्यामुळे शासनाने केवळ आश्वासने न देता नुकसानीचे तातडीने पंचनामे करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवावी, अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.