Desk | Amravati
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधी भांडारगृहात कालबाह्य औषधांचा मोठा साठा आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामान्य आणि गरजू रुग्णांसाठी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली औषधे सुरक्षितपणे साठवून त्यांचे वेळेत वितरण करणे अपेक्षित असताना, जिल्हा परिषद भांडारगृहातच मोठ्या प्रमाणात कालबाह्य औषधे आढळल्याचे तपासणीत समोर आले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधी भांडारगृहातील औषधे कालबाह्य झाल्याची बाब समोर आल्यानंतर प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल माणिकराव यांनी शुक्रवारी या औषधांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान भांडारगृहातील औषधांच्या साठ्याची पाहणी करण्यात आली असता अनेक औषधे वापरण्यायोग्य कालावधी संपल्यानंतरही साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. 2016-17 ते 2020-21 या कालावधीत पासूनची काही औषधे भांडारगृहात शिल्लक होती. त्यामध्ये काही औषधे कालबाह्य झाल्याचेही आढळले. विशेष म्हणजे, संबंधित औषधे कालबाह्य होण्यापूर्वी त्यांचा वापर किंवा वितरण का करण्यात आले नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकरणात औषधांच्या एफडीए तपासणीतील त्रुटीही समोर आल्या आहेत. भांडारगृहातील औषधांचा साठा योग्य तापमानात ठेवला गेला आहे की नाही, यासाठी आवश्यक असलेली तापमान नोंदणी व निरीक्षण प्रणाली उपलब्ध नसल्याचे तपासणीत दिसून आले. औषधांची गुणवत्ता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी साठवणुकीचे योग्य तापमान अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र या ठिकाणी त्याबाबत आवश्यक व्यवस्था नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाला आहे. तपासणीदरम्यान औषधांच्या साठवणुकीच्या ठिकाणी पाणी झिरपल्याचे आणि त्यामुळे औषधांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही निदर्शनास आले.
त्याचबरोबर वॉटर कूलर उपलब्ध नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे औषधांच्या भांडारगृहातील मूलभूत व्यवस्थापन कितपत योग्य आहे, यावरही चर्चा सुरू झाली आहे. औषधांचा कालबाह्य साठा आढळल्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कालबाह्य औषधांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया. नियमानुसार कालबाह्य औषधे स्वतंत्रपणे सुरक्षित ठेवून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असते. मात्र जिल्हा परिषदेकडे कालबाह्य औषधांच्या विल्हेवाट प्रक्रियेची पुरेशी व्यवस्था किंवा आवश्यक नोंद उपलब्ध आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. याशिवाय कालबाह्य औषधे आणि वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन संस्थेसोबत आवश्यक करार करण्यात आला आहे का, याचीही तपासणी होणे गरजेचे आहे. गरजू रुग्णांसाठी आलेली औषधेच कालबाह्य होईपर्यंत पडून राहणे ही बाब गंभीर मानली जात आहे. एका बाजूला आरोग्य केंद्रांमध्ये औषधांची गरज असताना दुसऱ्या बाजूला उपलब्ध औषधे योग्य वेळी वितरित न झाल्याने त्यांचा वापर होऊ शकला नाही, तर ही प्रशासनासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कालबाह्य औषधांचा साठा नेमका का वाढला, औषधांचे वेळेत वितरण का झाले नाही आणि साठवणुकीच्या नियमांचे पालन का करण्यात आले नाही, याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे. आरोग्य विभागाच्या भांडारगृहातील या प्रकारामुळे औषध व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
