Desk | Gadchiroli
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धान उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाचा खंड, वाढते तापमान आणि पिकांवरील विविध रोग-किडींच्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी उभे धान पीक पिवळे पडू लागले आहे. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांसमोर खराब होताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोरची तालुक्यातील काही भागात शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मोठ्या अपेक्षेने धानाची लागवड केली. बियाणे, खत, औषध, मजुरी आणि मशागतीसाठी मोठा खर्च झाला. काही शेतकऱ्यांनी तर घरातील दागिने मोडून बियाणे व शेतीसाठी लागणारा खर्च भागविला. मात्र, आता पीक संकटात सापडल्याने हा खर्च कसा वसूल करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. आधीच कर्जाचा भार असताना पीक हातातून गेल्यास कर्जफेडीसाठी पुन्हा कर्ज घ्यावे लागण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. धान पिकासाठी पाण्याची आवश्यकता असतानाच पावसाने मोठा खंड घेतला आहे. अनेक शेतांमध्ये जमिनीतील ओलावा कमी झाल्याने धानाची वाढ खुंटली असून पाने पिवळी पडत आहेत. काही भागात किडींचा प्रादुर्भावही वाढल्याने
शेतकऱ्यांना औषध फवारणीचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. मात्र, सततच्या खर्चामुळे आर्थिक अडचणी वाढत आहेत. चामोर्शी परिसरातील काही शेतकऱ्यांची परिस्थितीही अशीच आहे. धरण आणि जलसाठे जवळ असूनही शेतापर्यंत आवश्यक वेळी पाणी पोहोचत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. उभे पीक डोळ्यांसमोर जळताना पाहण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सिंचनाची व्यवस्था असूनही तिचा योग्य वेळी उपयोग झाला नाही, तर शेतीचा खर्च आणि मेहनत वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. याशिवाय काही भागात खोडकिडा, तुडतुडे यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. पिकांवर रोग-किडींचे संकट आणि दुसरीकडे पावसाची प्रतीक्षा, अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने बाधित क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन, कीडनियंत्रणासाठी मदत आणि पिकांच्या नुकसानीचे योग्य पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभे केलेले धान पीक सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला तर पिकाला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र पावसाचा खंड आणखी वाढल्यास उत्पादनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे “उभे पीक वाचवण्यासाठी तातडीने पाण्याची व्यवस्था करा आणि शेतकऱ्यांना आवश्यक मदत द्या,” अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
