Desk | bhandara
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व आमदार आज मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धान उत्पादक शेतकऱ्यांचे रखडलेले बोनस तसेच रब्बी हंगामात धान खरेदी केंद्रांवर विकलेल्या धानाचे प्रलंबित चुकारे तातडीने मिळावेत, अशी मागणी या भेटीत करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सर्व आमदार मुंबईत जाणार असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा मुद्दा मांडला जाणार आहे. विशेषतः धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बोनसचा प्रश्न सध्या महत्त्वाचा ठरला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे आमदारांकडून सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीत बोनसच्या प्रश्नावर चर्चा झाली होती. यावेळी धान उत्पादक जिल्ह्यांना बोनस देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचा दावा करण्यात आला आहे. बोनस देण्यासंदर्भात काही प्रशासकीय त्रुटी असल्यास त्या दूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा करण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. तसेच आगामी डिसेंबर अधिवेशनात यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता असल्याचेही आमदारांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश पालकमंत्री पंकज भोयर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेऊन त्याबाबतचा अहवाल शासनापर्यंत पोहोचवण्याच्या हालचाली सुरू आहेत. याशिवाय रब्बी हंगामात धान खरेदी केंद्रांवर विकलेल्या धानाचे चुकारे अद्याप प्रलंबित असल्याचा मुद्दाही आमदार मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे पैसे तातडीने मिळावेत, अशी मागणी केली जाणार आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सर्व आमदारांचे शिष्टमंडळ प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करणार आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसोबतच धानाचा बोनसही द्यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात येणार असल्याचे आमदारांनी सांगितले आहे. आता या भेटीनंतर मुख्यमंत्री आणि राज्य सरकारकडून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनस आणि प्रलंबित चुकारांबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे
