Desk nashik
नांदगावमध्ये दुष्काळाचे सावट; पाणी, चारा आणि पिकांच्या नुकसानीचा गंभीर प्रश्न नाशिक : पावसाने ओढ दिल्याने नांदगाव तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतीसह पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खरीप हंगामातील पिकांना पावसाअभावी मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांना आवश्यक मदत आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना आमदार सुहास कांदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पंचायत समिती, ग्रामविकास, जलसंधारण तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते. पाणीटंचाई, चाऱ्याची उपलब्धता आणि पीक नुकसानीबाबत प्रशासनाने तातडीने नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले. नांदगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण घटल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार, तालुक्यातील पावसाची टक्केवारी 105 वरून सुमारे 64 टक्क्यांपर्यंत घसरल्याचे बैठकीत सांगण्यात आले. तसेच आणेवारी सध्या सुमारे 51 ते 52 टक्क्यांच्या आसपास असल्याचे नमूद करण्यात आले. प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगानंतर आणेवारी आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसाने पुन्हा हजेरी लावली तरी आतापर्यंत झालेले पीक नुकसान भरून निघणार नाही, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही जोर धरत आहे. आमदार सुहास कांदे यांनी यापूर्वीही नांदगाव मतदारसंघातील दुष्काळसदृश परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही आगामी काळात अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणीसाठा नोव्हेंबरपर्यंत पुरेल, अशी परिस्थिती असल्याने त्यानंतर टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची आवश्यकता भासू शकते, अशी माहिती बैठकीत मांडण्यात आली. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आत्तापासूनच नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धताही मोठे आव्हान ठरत आहे. चारा नोव्हेंबरपर्यंतच उपलब्ध राहण्याची शक्यता असल्याने पुढील काळात चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करण्याची गरज निर्माण होऊ शकते. पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना तयार ठेवाव्यात, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
नांदगावमधील सध्याची परिस्थिती पाहता पाणीटंचाई, चारा आणि पीक नुकसान या तिन्ही आघाड्यांवर प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकरी आणि नागरिकांना आवश्यक मदत वेळेत मिळते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
