Top 5 This Week

Related Posts

BREAKING

BULDHANA : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका; वाहनचालकांमध्ये चिंत

Desk | Buldhana

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका; पाच दिवसांत चौथा अपघात, ट्रक जळून खाक मलकापूर पांगराजवळील थरारक घटना; अॅक्सेल तुटल्याने वाहन बॅरिकेडला धडकले, चालक सुखरूप बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या अवघ्या पाच दिवसांत चौथा अपघात झाल्याने महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी नागपूरहून जालना दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकचा अॅक्सेल अचानक तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट लोखंडी बॅरिकेडला धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने चालक परमेश्वर उद्धवराव चव्हाण यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर जवळपास पाच तासांनी या वाहनाला अचानक आग लागली आणि पाहता पाहता ट्रक जळून खाक झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहन क्रमांक एमएच-२० ईके-६००८ हे मध्यरात्रीच्या सुमारास नागपूरहून जालना दिशेने जात होते. मेहकर तालुक्यातील मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३००.२ जवळ अॅक्सेल तुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि वाहन बॅरिकेडला धडकले. अपघातात चालक बचावला असला तरी काही तासांनी वाहनाने अचानक पेट घेतल्याने घटनास्थळी खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. वाहतूक सुरक्षित करण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले. मात्र सकाळी सुमारे ६.१० वाजता वाहनाने अचानक पेट घेतला. छत्रपती संभाजीनगर नियंत्रण कक्षाला ६.१५ वाजता माहिती देण्यात आली. त्यानंतर महामार्ग पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने वाहनाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वाहनांची सुरक्षितता आणि वारंवार होणाऱ्या अपघातांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, पाच दिवसांत चार अपघात झाल्याने वाहनचालकांमध्येही चिंता वाढली आहे. अपघातानंतर वाहन जळून खाक झाले असले तरी चालकाचा जीव वाचणे ही मोठी दिलासादायक बाब ठरली. महामार्गावर वेग, वाहनांची तांत्रिक स्थिती, बॅरिकेडिंग आणि आपत्कालीन यंत्रणा याबाबत अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे