Desk | Nanded
नांदेडमध्ये अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा धडाका; 22 जुगाऱ्यांना अटक, 6 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त नांदेड : नांदेडमध्ये अवैध जुगार आणि सट्टा अड्ड्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत तब्बल 22 जुगाऱ्यांना अटक केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी वाहने तसेच जुगाराचे साहित्य असा सहा लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. विशेष म्हणजे, कारवाईनंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची घटनास्थळापासून पोलीस ठाण्यापर्यंत पाई परेड काढली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 सप्टेंबर रोजी हुडको परिसरात दादाराव जाधव यांच्या फार्म हाऊसच्या मागील बाजूस काही जण जुगार खेळत असल्याची माहिती नांदेड ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाईचे नियोजन केले. पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 15 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि पाच मोटरसायकली, तसेच जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. अचानक झालेल्या पोलिसांच्या कारवाईमुळे जुगार अड्ड्यावर उपस्थित असलेल्या व्यक्तींमध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर 1 सप्टेंबर रोजी वाजेगाव परिसरात आणखी एका ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. गुरुराज चांडोलकर यांच्या शेतालगतच्या मोकळ्या जागेवर सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत सात जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. अशा प्रकारे दोन्ही कारवायांमध्ये एकूण 22 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात संबंधित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नांदेड ग्रामीण परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार आणि सट्टा व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे. या कारवाईतील आणखी एक बाब चर्चेचा विषय ठरली आहे. अटक केलेल्या आरोपींची पोलिसांनी घटनास्थळापासून पोलीस ठाण्यापर्यंत पाई परेड काढली. अवैध धंद्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांना कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि अशा गैरप्रकारांना आळा बसावा, या उद्देशाने पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाब रोहन यांनी जुगार, मटका आणि इतर अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शहर तसेच ग्रामीण भागात अवैध व्यवसाय सुरू असल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे. दरम्यान, नांदेड ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध जुगार अड्डे चालवणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळातही अशा कारवाया सुरू राहणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
