Desk | Maharashtra
MPSC च्या ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेचा प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या गंभीर आरोपांमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. वडेट्टीवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की, राज्यातील लाखो तरुण दिवस-रात्र मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. आपल्या कुटुंबाच्या अपेक्षा, आर्थिक अडचणी आणि अनेक वर्षांच्या परिश्रमाच्या जोरावर ते सरकारी नोकरीचे स्वप्न पाहतात. मात्र वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खचत असून शासनावरील विश्वासही पूर्णपणे ढासळत चालला आहे. ते म्हणाले, “MPSC च्या ड्रग इन्स्पेक्टर भरतीचा पेपर परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर फिरत असल्याचे पुरावे समोर येत आहेत. हे अत्यंत गंभीर असून ही केवळ पेपरफुटी नाही, तर महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला विश्वासघात आहे. वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राख करून भ्रष्ट दलालांचे खिसे भरण्याचा उद्योग सुरू आहे का?” वडेट्टीवार यांनी पुढे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाचाही उल्लेख करत महायुती सरकारवर निशाणा साधला. “देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणामुळे मोठे आंदोलन झाले, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र त्या घटनेतूनही महाराष्ट्र सरकारने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. राज्यातील परीक्षा व्यवस्था पूर्णपणे ढासळली असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळ सुरू आहे,” अशी टीका त्यांनी केली.
महायुती सरकारवर हल्लाबोल करत वडेट्टीवार म्हणाले, “सरकारला विरोधकांचे पक्ष फोडण्यात, राजकीय गणिते जुळवण्यात आणि सत्तेचे खेळ करण्यात वेळ आहे; पण विद्यार्थ्यांचे पेपर फुटत असताना मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत. ही अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब आहे.” या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत त्यांनी स्पष्ट केले की, “पेपरफुटीच्या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला पाहिजे. यामागील दलाल, संबंधित अधिकारी आणि त्यांना राजकीय संरक्षण देणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्यांना कायद्याने कठोर शिक्षा झाली पाहिजे.” शेवटी विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला इशारा देत म्हटले की, “स्पर्धा परीक्षांची पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील तरुणांच्या स्वप्नांशी खेळ करणाऱ्यांना संरक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर कठोर कारवाई करा. अन्यथा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. तरुणांच्या भविष्याशी होणारा हा खेळ आता कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.”
