Desk | Maharashtra
मोशी येथील कचरा डेपोमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत राज्य सरकार, संबंधित प्रशासन आणि कंत्राटदारांवर गंभीर आरोप केले आहेत. या दुर्घटनेत नऊ निष्पाप कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून हा केवळ अपघात नसून भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि सत्तेच्या मग्रुरीमुळे घडलेला मानवनिर्मित बळी असल्याचा आरोप त्यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले की, मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या भ्रष्ट प्रशासनामुळे आज नऊ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कचऱ्याच्या तब्बल ६५ ते ७० फूट उंच ढिगाऱ्यापासून अवघ्या ३० मीटर अंतरावर प्रशासकीय इमारतीला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाच्या आशीर्वादाने हा निर्णय घेतला, याचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरणीय नियम, सुरक्षिततेचे निकष आणि मानवी जीव यांची जाणीवपूर्वक पायमल्ली करून परवानग्या देण्यात आल्या का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी पुढे सांगितले की, सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करून काही अधिकारी, कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींनी आर्थिक लाभ मिळवला, पण त्याची किंमत निष्पाप कर्मचाऱ्यांना आपल्या जीवाने चुकवावी लागली. ही घटना केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे नव्हे, तर भ्रष्ट व्यवस्थेच्या अमानुष चेहऱ्याचे जिवंत उदाहरण असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. या दुर्घटनेनंतर केवळ चौकशी समिती नेमून सरकारने आपली जबाबदारी संपल्याचे समजू नये, असा इशाराही त्यांनी दिला. संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि या प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर सदोष मनुष्यवधासह कठोर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी त्यांनी ठाम मागणी केली.
दोषींना शिक्षा झाल्याशिवाय मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही, असेही ते म्हणाले. वडेट्टीवार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आणि जखमी कर्मचाऱ्यांवर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्यातील सर्व कचरा डेपो आणि वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पांचे स्वतंत्र तांत्रिक व सुरक्षा ऑडिट करण्यात यावे, तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. “मोशीतील हा ढिगारा फक्त कचऱ्याचा नव्हता, तर सरकारच्या संवेदनाहीन, निष्काळजी आणि भ्रष्ट कारभाराचे प्रतीक होता. जर या प्रकरणातही दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला, तर जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल. प्रत्येक मृताच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. अन्यथा इतिहास या घटनेची नोंद सरकारच्या अमानुष आणि भ्रष्ट प्रशासनाचा काळा अध्याय म्हणून करेल,” अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
