Desk | Mumbai
राज्याच्या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील गंभीर समस्या विधानसभेत उपस्थित करत काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील अनेक ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्य प्रकल्प मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे व निधीअभावी प्रभावीपणे कार्यरत नसल्याचा आरोप त्यांनी केला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्यसेवा मिळण्यासाठी सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले की, ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात आले असले तरी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या 83 पदांच्या मंजुरीचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. अत्याधुनिक इमारत, वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक पायाभूत व्यवस्था उपलब्ध असूनही डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी नसल्यामुळे रुग्णांना अपेक्षित आरोग्यसेवा मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ही परिस्थिती केवळ ब्रह्मपुरीपुरती मर्यादित नसून राज्यातील अनेक ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून केवळ इमारती उभारून उपयोग नाही, तर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय राज्यातील अनेक आरोग्य प्रकल्पांची 50 ते 70 टक्के कामे पूर्ण झाली असून केवळ निधीअभावी ती रखडल्याचा मुद्दाही वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला. सरकारने अशा सर्व प्रलंबित प्रकल्पांचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्राधान्याने निधी दिल्यास ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होईल, असेही त्यांनी नमूद केले. प्राथमिक आरोग्य केंद्रांना सध्या दिला जाणारा 1 कोटी 60 लाख रुपयांचा निधी अत्यंत अपुरा असल्याचे सांगत हा निधी किमान 5 कोटी रुपये करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर 40 ते 50 गावांचा आरोग्यभार असल्याने उपलब्ध निधीतून आवश्यक सुविधा उभारणे आणि देखभाल करणे अशक्य होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, शिपाई तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेला विशेष कोरोना भत्ता आणि इतर प्रलंबित देयके अद्याप मिळालेली नसल्याबद्दलही वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा योग्य सन्मान राखत त्यांचे सर्व थकीत भत्ते आणि देयके तातडीने अदा करावीत, अशी त्यांनी मागणी केली. ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरणे, रखडलेले आरोग्य प्रकल्प पूर्ण करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी निधीत वाढ करणे आणि कोरोना काळातील आरोग्य कर्मचाऱ्यांची थकीत देयके त्वरित वितरित करणे ही काळाची गरज असल्याचे वडेट्टीवार यांनी अधोरेखित केले. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार,
