Top 5 This Week

Related Posts

BREAKING

MAHARASHTRA : बिश्नोई गँगवर कारवाईत, वडेट्टीवारांचा सरकारला सवाल..

Desk | Mumbai

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार निशाणा साधला. बिश्नोई गँगकडून महाराष्ट्रात दहशत निर्माण करून लूटमार, खंडणी आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत त्यांनी गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विजय वडेट्टीवार म्हणाले की, बिश्नोई गँगकडून राज्यात व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना धमकावण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांनाही या गँगकडून खंडणीसाठी धमकी मिळाल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. अशा घटना वाढत असताना राज्य सरकार आणि गृहखाते या टोळीविरोधात प्रभावी कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याची टीका त्यांनी केली. यापूर्वीही बिश्नोई गँगशी संबंधित अनेक गंभीर गुन्हे घडल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले.

माजी राज्यमंत्र्यांची हत्या, चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या घरांवर झालेला गोळीबार तसेच अनेक व्यापाऱ्यांच्या घरांवर झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, या गँगकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ल्यांची जबाबदारी उघडपणे स्वीकारली जाते. गृह खात्याच्या नाकावर टिच्चून अशा प्रकारे गुन्ह्यांची कबुली दिली जात असतानाही संबंधित आरोपींवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले. वडेट्टीवार यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, या गँगचा म्होरक्या परराज्यातील तुरुंगात बसून महाराष्ट्रात दहशत पसरवत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र पोलिसांनी त्याला चौकशीसाठी कधी ताब्यात घेतले आहे का? त्याची कसून चौकशी करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मे महिन्यात घडलेल्या एका गंभीर प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्या घटनेतील १२ आरोपींपैकी केवळ ४ आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित ८ आरोपी अद्याप फरार आहेत. अनेक महिने उलटल्यानंतरही त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. हे आरोपी नेमके कधी पकडले जाणार आणि तपासाला गती कधी मिळणार, असा सवाल त्यांनी सरकारला केला. राज्यातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी बिश्नोई गँगविरोधात कठोर आणि निर्णायक कारवाई करणे आवश्यक असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. गुन्हेगारांवर वेळीच अंकुश ठेवण्यात अपयशी ठरल्यास राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला.विधानसभेत उपस्थित केलेल्या या प्रश्नांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी आणि बिश्नोई गँगविरोधातील कारवाईचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आता सरकार या प्रश्नांवर काय उत्तर देते आणि पुढील काळात कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.