डेस्क | नागपूर
राज्यात बालविवाहाच्या वाढत्या तक्रारी आणि धक्कादायक आकडेवारी लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता यापुढे लग्नपत्रिकेवर (Wedding Invitation Card) वधू आणि वराच्या नावापुढे त्यांची ‘जन्मतारीख’ लिहिणे अनिवार्य करण्यात येणार आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
राजस्थान सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही बालविवाहाच्या समस्येला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच या संदर्भात नवीन नियमावली जाहीर केली जाणार आहे.
सरकारला जाग का आली?
राज्यातील काही जिल्ह्यांमधील बालविवाहांची आकडेवारी समोर आल्यानंतर प्रशासनासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः परभणी सारख्या जिल्ह्यांमध्ये तब्बल ४८ टक्के मुलींचे लग्न अल्पवयातच होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या गंभीर प्रकाराला चाप लावण्यासाठी, लग्नपत्रिकेवरच वधू-वरांचे वय स्पष्टपणे नमूद करणे आता अनिवार्य असणार आहे.
या निर्णयाचे फायदे:
बालविवाहांना आळा: लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर जन्मतारीख असल्यामुळे लग्नापूर्वीच वधू-वरांच्या वयाची खात्री होणे सोपे होईल. सामाजिक जाणीव: समाजाला वयाबाबत जागृत राहण्यास मदत होईल. पारदर्शकता: या नियमामुळे लग्नामध्ये कायदेशीर पारदर्शकता येईल.
प्रशासनाची भूमिका: बालविवाह प्रतिबंधक कायद्याची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे. राज्य सरकारकडून या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास, लग्नाचे कार्ड छापताना आता प्रिंटिंग प्रेसवाल्यांनाही वयाचा दाखला किंवा आधार कार्डची पडताळणी करावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
