Desk | Amravati
शहर गुन्हे शाखेने अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक खून प्रकरणाचा यशस्वी उलगडा करत दोन आरोपींना अटक केली आहे. बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या अज्ञात मृतदेहाच्या तपासातून पोलिसांनी हा धक्कादायक गुन्हा उघडकीस आणला. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे मिळालेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वजीर पटेल यांच्या बंद असलेल्या दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात करण्यात आली. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध तांत्रिक साधनांचा वापर करून तपासाची दिशा निश्चित केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने तपास सुरू ठेवण्यात आला.
त्याचबरोबर डीएनए चाचणीसाठी नमुने पाठविण्यात आले. अखेर डीएनए अहवालाच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख अब्दुल रियाज अब्दुल अनीस (वय 60), रा. अलीमनगर, अमरावती अशी पटली. विशेष म्हणजे, अब्दुल रियाज हे काही दिवसांपासून बेपत्ता होते आणि त्याबाबत नागपुरी गेट पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंदही करण्यात आली होती. मृत व्यक्तीची ओळख पटताच पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सखोल चौकशीनंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी अब्दुल रियाज यांना त्यांच्या घरातून बोलावून घेतले आणि त्यानंतर त्यांचा खून केल्याची माहिती समोर आली. गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आल्याचेही तपासात उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी शेख इकराम शेख चांद (वय 27, व्यवसाय चालक, रा. सहारा नगर, अमरावती) आणि नसरीन बानू अब्दुल रियाज (वय 37, रा. अल करीम नगर क्रमांक 2, अमरावती) यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंखे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली. अत्यंत कमी धागेदोरे उपलब्ध असताना आधुनिक तंत्रज्ञान आणि अथक परिश्रमांच्या जोरावर पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला असून या प्रकरणाची शहरभर चर्चा सुरू आहे.
