डेस्क | नांदेड
ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी फेस्कॉमच्या उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाच्या वतीने बुधवारी नांदेडमध्ये भव्य आणि अभूतपूर्व मूक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. ‘नागरी हक्क संरक्षण लक्षवेधी मूक जनजागरण पदयात्रा’ असे नाव देण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे 7 हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कडक उन्हाची पर्वा न करता, अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेच्या मार्गाने काढण्यात आलेल्या या पदयात्रेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
या पदयात्रेची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व डॉ. हंसराज वैद्य यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी कोणतीही घोषणाबाजी किंवा फलकबाजी न करता आपल्या मागण्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला.
विशेष म्हणजे, शहरात कलम 144 लागू असतानाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करून ही पदयात्रा शांततेत पार पडली. त्यामुळे या आंदोलनाचे वेगळेपण अधिक ठळकपणे अधोरेखित झाले.
पदयात्रा मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचली. तेथे प्रशासनाच्या अधिकृत प्रतिनिधींना ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले. हे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कल्याण मंत्रालय आणि आयोगाची स्थापना, विविध योजनांसाठी पात्रतेची वयोमर्यादा 60 वर्षे निश्चित करणे, 2007 च्या ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, तसेच गरीब, शेतकरी, शेतमजूर, विधवा आणि दिव्यांग ज्येष्ठांना सन्मानजनक मानधन देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. हंसराज वैद्य यांनी शासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. “महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘लाडके मायबाप’ योजना तातडीने सुरू करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
या योजनेअंतर्गत प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला दरमहा 5 हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली. वाढत्या महागाईच्या काळात अन्न, औषधोपचार आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ही मदत अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही टाकाऊ नाही, हे सरकारने गांभीर्याने लक्षात घ्यावे,” असा इशाराही त्यांनी दिला.
नांदेडच्या इतिहासात ज्येष्ठ नागरिकांचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेले हे शांततापूर्ण आंदोलन दुर्मिळ मानले जात आहे. कोणताही गोंधळ न करता हजारो वयोवृद्धांनी प्रशासनासमोर आपल्या हक्कांच्या मागण्या मांडल्या. या मूक पदयात्रेने शासन आणि प्रशासनाला ज्येष्ठांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याचा स्पष्ट संदेश दिला असून, आता ‘लाडके मायबाप’ योजनेबाबत शासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
