Top 5 This Week

Related Posts

NAGPUR : HTBT कापूस बियाण्यांची मोठी तस्करी

Desk | Nagpur

नागपूरच्या वाडी परिसरात पोलिस आणि कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्यांच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश केला आहे. सरकारी अनुदानित खताच्या पोत्यांमध्ये लपवून नेण्यात येत असलेली प्रतिबंधित कापूस बियाण्यांची ७९८ पाकिटे जप्त करण्यात आली असून या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांसह वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा मिळून सुमारे ८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाडी पोलिसांना एका तीनचाकी वाहनातून प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी कृषी विभागाशी संपर्क साधला आणि संयुक्त कारवाईचे नियोजन करण्यात आले. कृषी विभागाच्या रीना डोंगरे आणि गीतांजली नांदुरकर या अधिकाऱ्यांनी पोलिसांसोबत संबंधित वाहनाचा शोध घेत त्याला अडवले.

वाहनाची प्राथमिक तपासणी करताना त्यामध्ये १३ प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये अनुदानित एनपीके खत भरलेले असल्याचे दिसून आले. मात्र, अधिकाऱ्यांना संशय आल्याने पोत्यांची सखोल तपासणी करण्यात आली. यावेळी खताच्या पोत्यांमध्ये अतिशय हुशारीने लपवून ठेवलेली प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची तब्बल ७९८ पाकिटे आढळून आली. यानंतर पोलिसांनी तात्काळ बियाणे आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त केले. या प्रकरणी योगेश भीमराव डबारसी आणि समीर काकडे, दोघेही नागपूर येथील रहिवासी, यांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत त्यांनी हे बियाणे एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम सोपविण्यात आल्याचे सांगितले. पुढील सूचना त्यांना मोबाईल फोनवरून मिळणार असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, हे बियाणे नेमके कोणी दिले आणि कोणाकडे पोहोचवायचे होते, याबाबत ते कोणतीही स्पष्ट माहिती देऊ शकले नाहीत. दरम्यान, पोलिस आणि कृषी विभागाला ही तस्करी एखाद्या मोठ्या आणि संघटित रॅकेटशी संबंधित असल्याचा संशय आहे. प्रतिबंधित बियाण्यांची अवैध विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणारे मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता तपास यंत्रणांकडून वर्तविण्यात येत आहे. आरोपींकडून सुरू असलेल्या चौकशीतून या संपूर्ण पुरवठा साखळीचा आणि त्यामागील मुख्य सूत्रधारांचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईला पोलिस आणि कृषी विभागाचे मोठे यश मानले जात असून, शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्यांची खरेदी करावी तसेच संशयास्पद बियाण्यांच्या विक्रीची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.