Desk | Wardha
जिल्ह्यातील सिंधी रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे रेल्वे प्रवासी आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या दक्षिण सुपरफास्ट एक्सप्रेसवर एका व्यक्तीने अचानक दगडफेक केल्याने गार्डसह अनेक प्रवासी जखमी झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही काळासाठी रेल्वेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सुपरफास्ट एक्सप्रेस सिंधी रेल्वे स्थानक परिसरातून वेगाने मार्गक्रमण करत असताना एका व्यक्तीने अचानक ट्रेनवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. वेगात धावणाऱ्या ट्रेनवर दगड आदळल्याने काही डब्यांच्या डक्यांच्या काचा फुटल्या. फुटलेल्या काचांचे तुकडे डब्यांमध्ये उडाल्याने ट्रेनच्या गार्डसह तीन ते चार प्रवासी जखमी झाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आणि काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याला पुढील वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमी झालेल्या प्रवाशांवर आणि गार्डवर तात्काळ प्राथमिक उपचार करण्यात आले.
सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. रेल्वे मार्गांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर आव्हान ठरत आहेत. अशा घटनांमुळे केवळ प्रवाशांचे प्राण धोक्यात येत नाहीत, तर रेल्वेच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे रेल्वे मार्गालगतच्या संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा वाढविणे, गस्त मजबूत करणे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कोणतीही संशयास्पद घटना अथवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ रेल्वे सुरक्षा बल किंवा रेल्वे पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे
