Top 5 This Week

Related Posts

BREAKING

BULDHANA : जिवंत शिवानीने उघड केलं मोठं रहस्य!”

Desk | Buldhana

बुलढाणा जिल्ह्यातील गाजलेल्या शिवानी कळमेकर प्रकरणाने आता राज्यभर खळबळ उडवली आहे. ज्या तरुणीची हत्या झाल्याचा दावा करत पोलिसांनी तिच्या वडिलांना आणि भावाला अटक केली होती, तीच तरुणी जिवंत अवस्थेत पोलीस ठाण्यात हजर झाल्याने संपूर्ण तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या प्रकरणात आणखी धक्कादायक आरोप समोर आले असून, शिवानीचे वडील बापूराम कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांनी पोलिसांनी दबाव टाकून खोटा कबुलीजबाब घेतल्याचा आरोप केला आहे. 26 एप्रिल रोजी जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव शिवारात अर्धवट जळालेला आणि मुंडके नसलेला मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटलेली नसतानाही पोलिसांनी तो शिवानी कळमेकरचाच असल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर अवघ्या 13 दिवसांत गुन्ह्याचा छडा लावल्याचा दावा करत पोलिसांनी शिवानीच्या वडिलांना आणि भावाला अटक केली. इतकेच नव्हे तर दोघांनी हत्येची कबुली दिल्याचे सांगत पोलिसांनी आपली कामगिरीही जाहीर केली होती. मात्र 28 मे रोजी संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले

शिवानी कळमेकर स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचली आणि आपण जिवंत असल्याचे सांगितले. यानंतर करण्यात आलेल्या डीएनए चाचण्यांमध्ये मृतदेह शिवानीचा नसल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, तब्बल 19 दिवस तुरुंगात राहिलेल्या बापूराम आणि अजय कळमेकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. प्रकरण इथेच थांबले नाही. मुक्त झाल्यानंतर बापूराम आणि अजय यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. पोलिसांनी मारहाण, धमक्या आणि कुटुंबाला अडकवण्याची भीती दाखवत हत्येची खोटी कबुली द्यायला भाग पाडल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच जामिनासाठी पैशांची मागणी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बुलढाणा पोलिसांची मोठी बदनामी झाली असून आतापर्यंत दोन पोलीस निरीक्षकांसह अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालकही या प्रकरणावर लक्ष ठेवून असून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न अद्याप कायम आहे. सुनगाव शिवारात सापडलेला अर्धवट जळालेला मृतदेह नेमका कोणाचा? त्या महिलेची हत्या कोणी आणि का केली? या प्रश्नांची उत्तरे अजूनही पोलिसांकडे नाहीत. त्यामुळे हे प्रकरण केवळ पोलिसांच्या चुकीच्या तपासाचे उदाहरण आहे की यामागे आणखी एखादे मोठे रहस्य दडले आहे, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.