Top 5 This Week

Related Posts

BREAKING

MAHARASHTRA : बोरीवलीत खळबळ!

Desk | Mumbai

केंद्र, राज्य आणि मुंबई महानगरपालिकेत भाजपची सत्ता असतानाही बोरीवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आजपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. बोरीवलीतील वाढते अतिक्रमण, फुटपाथवरील बेकायदा व्यवसाय, ड्रग्ज व दारू विक्री आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर त्यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. संजय उपाध्याय यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सत्ता आमची आहे म्हणून चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे, हा आमचा स्वभाव नाही. नागरिकांनी कोट्यवधी रुपये खर्च करून घरे घेतली आहेत, कर भरला आहे. त्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.” उपाध्याय यांनी बोरीवलीतील अनेक भागांमध्ये फुटपाथवर कार डीलर्सचा कब्जा असल्याचा आरोप केला.

काही ठिकाणी ग्राहकांना गाड्या दाखवण्यासाठी रस्त्यावरील लेनच वापरल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महावीर नगर परिसरात फुटपाथ आणि सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून बेकायदा धंदे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. याशिवाय काही भागांमध्ये खुलेआम दारू विक्री, ड्रग्जचा व्यवसाय, रस्त्यावरच स्वयंपाक, आंघोळ आणि इतर गैरप्रकार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व प्रकारांमुळे महिला व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. “फुटपाथ नागरिकांसाठी असतात, अतिक्रमणासाठी नाहीत. काही लोकांनी सार्वजनिक जागा स्वतःच्या मालमत्तेसारख्या वापरण्याची मानसिकता तयार केली आहे. ही मानसिकता मोडून काढण्यासाठीच आम्ही आंदोलन करत आहोत,” असे उपाध्याय म्हणाले. दरम्यान, अतिक्रमण हटवण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईबद्दल त्यांनी मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांचे कौतुक केले. विशेषतः संयुक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) सत्यनारायण चौधरी यांनी तक्रारीची दखल घेऊन तत्काळ कारवाई सुरू केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. बोरीवलीतील फुटपाथ, रस्ते आणि सार्वजनिक जागा नागरिकांसाठी मोकळ्या व्हाव्यात, बेकायदा धंद्यांवर कायमस्वरूपी कारवाई व्हावी आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित व्हावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनामुळे बोरीवलीतील अतिक्रमण आणि बेकायदा व्यवसायांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन यावर किती प्रभावी कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.