Desk | Nagpur
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करत देशातील आर्थिक स्थिती, बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले आहे. देशाची वास्तविक परिस्थिती गंभीर असताना जीडीपीचे आकडे फुगवून दाखवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले की, देशात बेरोजगारी वाढली आहे, महागाईचा भडका उडाला आहे, पेट्रोल डिझेलसाठी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. निर्यात-आयात क्षेत्रात मोठी घट झाली असून कृषी क्षेत्रातही गंभीर संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून विकासाचे चित्र रंगवले जात असल्याची टीका त्यांनी केली. युवकांमध्ये वाढत्या असंतोषाचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले की, रोजगारासाठी भटकणारा तरुण आता शांत बसणार नाही. देशात सुरू असलेल्या आंदोलनांमधून परिवर्तनाची सुरुवात झाली असून भविष्यात याचे मोठे परिणाम दिसून येतील. युवाशक्ती आता सरकारला जाब विचारणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. अभिजीत दीपके यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी सरकारवर
विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जाते, अशी टीका करत त्यांनी लोकशाही आणि संविधानाच्या चौकटीत लढणाऱ्यांना घाबरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले. ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारची भूमिका ओबीसी समाजाच्या हिताची नसल्याचा आरोप केला. इतर समाजांना सवलती देताना ओबीसी समाजाच्या लोकसंख्येचा आणि गरजांचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि इतर योजनांमध्ये अधिक तरतूद करण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घोडेबाजार झाल्याचा गंभीर आरोपही वडेट्टीवार यांनी केला. काही नगरसेवकांना पैसे वाटप झाल्याच्या चर्चांचा उल्लेख करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. पैसे घेणारे आणि देणारे दोघांवरही कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. राजकारणाचे व्यापारीकरण होत असल्याची खंत व्यक्त करत वडेट्टीवार यांनी लोकशाही व्यवस्थेसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे सांगितले.
