Top 5 This Week

Related Posts

BREAKING

MAHARASHTRA : 23 नगरसेवक गायब; पडद्यामागे कोण?”

Desk | gadchiroli

महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल 23 नगरसेवक संपर्काबाहेर असल्याचा दावा करत, त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये देऊन फोडण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले की, विधान परिषद निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून विविध प्रकारचे दबाव आणि आर्थिक आमिषे दाखवली जात आहेत. अनेक नगरसेवक अचानक संपर्काबाहेर गेले असून, त्यामागे मोठे राजकीय षड्यंत्र असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. यावेळी वडेट्टीवार यांनी राज्यातील राजकारणावरही जोरदार टीका केली.

“निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात आली आहे. पैशांच्या जोरावर लोकप्रतिनिधींना प्रभावित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर विदर्भातील अनेक मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असून, नगरसेवकांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वडेट्टीवार यांच्या या आरोपांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या वातावरणात विधान परिषद निवडणुकीचा रंग आणखी चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.