Top 5 This Week

Related Posts

BREAKING

PUNE : पुण्यात शिक्षणाच्या नावाखाली मोठा गैरप्रकार?

Desk | Pune

पुण्यातील स्वारगेट परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) एका कथित बेकायदेशीर स्टडी सेंटरवर धडक कारवाई करत शिक्षण क्षेत्रातील गंभीर गैरप्रकार उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. विद्यार्थ्यांची दिशाभूल करून प्रवेश प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप करत मनविसेने संबंधित केंद्राविरोधात जोरदार आंदोलन छेडले. मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्टडी सेंटरमध्ये सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेची पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे सांगितले. अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून कागदपत्रे स्वीकारली जात होती, मात्र त्यांना नेमक्या कोणत्या महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे, याबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. काही विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्या कॉलेजचे नावही माहिती नसते, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी मनसेने वानवडी येथील गिरमे कॉलेजच्या नावाने फॉर्म वाटप होत

असल्याबाबतही प्रश्न उपस्थित केले.  लेजच्या बाहेर प्रवेश अर्ज वाटण्याची परवानगी आहे का? संबंधित स्टडी सेंटर आणि कॉलेज व्यवस्थापनाचा नेमका संबंध काय? तसे  विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्या नियमांचे पालन केले जाते? असे अनेक सवाल मनविसेने उपस्थित केले. मनसेच्या मते, शहरातील अशा अनेक स्टडी सेंटर्समध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र ही केंद्रे ना अधिकृत महाविद्यालये आहेत, ना अधिकृत क्लासेस. त्यामुळे त्यांच्या वैधतेबाबत गंभीर शंका निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांना आकर्षक आश्वासने देऊन प्रवेश दिला जातो आणि नंतर त्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. याशिवाय विद्यार्थ्यांच्या फीमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याचाही आरोप मनसेने केला आहे. विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या शुल्कातील मोठा हिस्सा एजंटांकडे जातो, तर उर्वरित रक्कम महाविद्यालयांकडे दिली जाते. या संपूर्ण साखळीत विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक तसेच शैक्षणिक फसवणूक होत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला  दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित स्टडी सेंटर, एजंट आणि जबाबदार व्यक्तींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेकडून करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पुण्यातील शिक्षण क्षेत्रातील कथित गैरप्रकार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले असून प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.