Desk | Pune
पुणे विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर महाविकास आघाडीत अंतर्गत वाद उफाळून आला आहे. काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांच्यानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पुणे शहर प्रमुख वसंत मोरे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) वर गंभीर आरोप केले आहेत. वसंत मोरे यांनी दावा केला की, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ऐनवेळी माघार घेत महायुतीला मदत केली. त्यामुळे हा केवळ राजकीय निर्णय नसून “विश्वासघात” असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच या संपूर्ण प्रक्रियेत घोडेबाजार किंवा काही प्रकारची राजकीय सेटलमेंट झाल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. मोरे म्हणाले की, ठाणे आणि पुणे या दोन्ही ठिकाणी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे या घडामोडींमागे काही राजकीय गणित असल्याचा संशय निर्माण होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही
गटांवर निशाणा साधताना मोरे यांनी “एकाच नाण्याच्या दोन बाजू” अशी टीका केली. महानगरपालिका निवडणुकांपासूनच महाविकास आघाडीत अशा प्रकारचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी वारंवार फसवणूक झाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील “झारीतले शुक्राचार्य शोधण्याची गरज असल्याचे सांगितले. अशा नेत्यांमुळेच पुण्यात आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, वसंत मोरे यांनी आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाने स्वतंत्रपणे लढण्याचा विचार करावा, अशी भूमिका मांडली. पुण्यात शिवसेनेची स्वतःची ताकद असून रस्त्यावर उतरून विरोधी पक्षाची भूमिका आम्हीच प्रभावीपणे बजावत असल्याचा दावा त्यांनी केला. महाविकास आघाडीतील या आरोप-प्रत्यारोपांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांपूर्वी विरोधकांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
